मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर लँडिगमध्ये विघ्न; हेलिपॅडवर ठेवले लोखंडी पिंप
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 11:42 AM2018-02-20T11:42:54+5:302018-02-20T11:44:43+5:30
हेलिकॉप्टरचा अपघात होता होता थोडक्यात बचावला.
नवी दिल्ली: उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या ताफ्यातील कर्मचारी आणि भारतीय सैन्याच्या अधिकाऱ्यांमध्ये सोमवारी बाचाबाची झाल्याचा प्रकार घडला. हा वाद इतका टोकाला पोहोचला की, लष्कराच्या अधिकाऱ्यांनी हेलिपॅडवर लोखंडी पिंप ठेवून मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर उतरण्यास अटकाव केला. त्यामुळे त्रिवेंद्र सिंह रावत यांचे हेलिकॉप्टर आयत्यावेळी दुसऱ्या ठिकाणी उतरवावे लागले. यावेळी त्यांच्या हेलिकॉप्टरचा अपघात होता होता थोडक्यात बचावला. या घटनेनंतर उत्तराखंडमधील सरकारी अधिकारी आणि सैन्यामध्ये भांडण जुंपले आहे. मुख्यमंत्री कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडून या प्रकरणी लष्करी अधिकाऱ्यांविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी उत्तरकाशी जिल्ह्यातील सावनी गावात मोठी घराला आग लागली होती. या आगीत मोठ्याप्रमाणावर वित्तहानी आणि पशुधनाचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर त्रिवेंद्र सिंह रावत याठिकाणी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आला होता. त्यासाठी मुख्यमंत्रांचे हेलिकॉप्टरने देहरादूनच्या जीटीसी हेलिपॅडवर उतरणार होते. मात्र, ऐनवेळी भारतीय लष्कराने आक्षेप घेत गोल्ड ग्राऊंडच्या प्रवेशद्वारावर स्वत:ची गाडी लावून हा मार्ग रोखून धरला. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यातील कर्मचाऱ्यांनी ही गाडी हटवण्यास सांगितले. तेव्हा हा आमचा परिसर असून याठिकाणी आमच्या परवानगीनेच लोक येऊ शकतात, असे लष्करी अधिकाऱ्याने म्हटले. एवढेच नव्हे तर सैन्याने मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर ज्या हेलिपॅडवर लँड होणार होते तिथे लोखंडी पिंप ठेवले. त्यामुळे वैमानिकाला ऐनवेळी मैदानातील दुसऱ्या जागेवर हेलिकॉप्टर उतरवावे लागले. मात्र, यामुळे हेलिकॉप्टरचा अपघात होण्याची शक्यता होती.
दरम्यान, या घटनेनंतर त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सैन्याधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दल नाराजी व्यक्त केली. देशातील जमीन ही खासगी मालकीची नसून त्यावर संपूर्ण देशाचा हक्क आहे. दरम्यान, आता या प्रकरणात पुढे काय होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.