चीन अन् भारतामधले वाद हे एकाच घरातल्या दोन भावांसारखे- चिनी राजदूत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 02:50 PM2019-05-22T14:50:12+5:302019-05-22T14:50:21+5:30
भारतातले चिनी राजदूत लू जोहुई यांनी डोकलामच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
नवी दिल्लीः भारतातले चिनी राजदूत लू जोहुई यांनी डोकलामच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया दिली आहे. चीन आणि भारतात एखाद्या मुद्द्यावरून वाद होणं हे स्वाभाविक आहे. घरातल्या दोन भावांमध्ये जसे वाद असतात, तशाच प्रकारे चीन आणि भारताचा वाद आहे. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध सलोख्याचे असून, दोन्ही देशांमधील चढ-उतार आता थांबले आहेत. दोन्ही देशांमधल्या प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वात भारत-चीन प्रगतिपथावर आहे. दोन्ही देशांमधील संबंध योग्य दिशेनं पुढे जावेत आम्हाला ही आशा आहे.
ते म्हणाले, पुढच्या वर्षी आम्ही दोन्ही देशांतील द्विपक्षीय संबंधांचा 70वा वर्धापन दिन साजरा करणार आहोत. भारत आणि चीनमधील संबंध दिवसेंदिवस वृद्धिंगत व्हावेत ही आमची इच्छा आहे. जून 2017मध्ये भारत आणि चीनमध्ये डोकलामच्या मुद्द्यावर वाद झाला होता. हा तणाव कमी करण्यात लू यांचा मोलाचा वाटा आहे. दोन महान देशांतही काही चुकीच्या गोष्टी होणं स्वाभाविक आहे. एकाच घरातल्या दोन भावांमध्ये असलेल्या वादासारखं होतं. आम्ही एकत्र काम केलं असून, समस्येचा तोडगा काढला आहे. त्याच मुद्द्यावर दोन्ही देशांमध्ये द्विपक्षीय संबंध सामान्य झाले आहेत. दोन्ही देशांतील नेत्यांनी अद्भुत काम केलं आहे.