कोलकाता बंदराच्या नामांतरावरून उफाळला वाद; डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जींचे नाव देण्यास विरोध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 01:54 AM2020-01-13T01:54:49+5:302020-01-13T01:55:52+5:30
केंद्र सरकारच्या योजनांची पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी करण्यास सरकार तयार नाही.
कोलकाता : कोलकाता बंदराला जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे नाव देण्याचा समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी पार पडला. त्यावरून मोदी हे गेमचेंजरपेक्षा नेमचेंजरच अधिक आहेत, अशी टीका माकपने केली आहे. या नामांतर कार्यक्रमाला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित राहिल्या नाहीत.
कोलकाता बंदराच्या १५०व्या वर्धापन दिनी झालेल्या या सोहळ्यात मोदी म्हणाले की, देशामध्ये झपाट्याने औद्योगिकीकरण व्हावे, यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी भगीरथ प्रयत्न केले होते. एक देश, एक राज्यघटना या तत्त्वासाठी त्यांनी बलिदान केले. त्यामुळेच त्यांचे नाव कोलकाता बंदराला देण्यात आले आहे.
मोदी म्हणाले की, केंद्र सरकारच्या योजनांची पश्चिम बंगालमध्ये अंमलबजावणी करण्यास सरकार तयार नाही. या योजनांच्या लाभापासून पश्चिम बंगालमधील जनता यापुढे फार काळ वंचित राहाणार नाही. पंतप्रधान मोदी हे गेमचेंजरपेक्षा नेमचेंजरच अधिक आहेत, अशी टीका माकपच्या पॉलिट ब्युरोचे सदस्य मोहम्मद सलीम यांनी केली आहे. कोलकाता बंदराचे नाव बदलले असले, तरी बंदराच्या कारभारामध्ये सुधारणा होण्याची शक्यता नाही, असेही मोहम्मद सलीम म्हणाले. कोलकातातील व्हिक्टोरिया मेमोरियल या प्रख्यात इमारतीला झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांचे नाव द्या, अशी मागणी भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केली आहे.