वसुंधराराजे, शेखावत यांच्यात जागांवरून वाद; कैलाश चौधरी, अर्जुन मेघवाल निवडणूक न लढण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 05:34 AM2023-10-21T05:34:09+5:302023-10-21T05:34:30+5:30
पक्षनेतृत्त्व शेखावत यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून विचार करीत आहे.
- संजय शर्मा
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे आणि केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांच्यात जागांवरून जोरदार वाद झाला. भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा कलह उघड झाला.
गजेंद्रसिंह शेखावत हे जोधपूरचे भाजपचे खासदार असून केंद्रीय मंत्रीही आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे जोधपूरच्या सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवतात. गजेंद्रसिंह शेखावत हे जोधपूर आणि सरदारपुरा जागा सोडून पोखरणची जागा मागत आहेत. ही जागा भाजपसाठी सुरक्षित समजली जाते. पक्षनेतृत्त्व शेखावत यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून विचार करीत आहे.
गजेंद्रसिंह शेखावत यांना आव्हान देताना माजी मुख्यमंत्री वसुंधराराजे म्हणाल्या की, ते जर राजस्थानमधील मोठे नेते असतील तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या सरदारपुरामधून गेहलोत यांच्याविरुद्ध निवडणूक का लढत नाहीत? केंद्रीय मंत्री ज्यांना मोठे केंद्रीय मंत्री केले आहे, ते अवघड जागांवर निवडणूक का लढवत नाहीत? असा सवालही त्यांनी केला.
४० स्टार प्रचारक उतरणार मैदानात
रायपूर : काँग्रेसने स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. स्टार प्रचारकांच्या यादीत ४० नेत्यांची नावे आहेत. यात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, प्रियांका गांधी, राहुल गांधी, अधीर रंजन चौधरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांचा समावेश आहे. हे सर्वजण छत्तीसगडमध्ये स्टार प्रचारकांची जबाबदारी सांभाळतील.