वादग्रस्त न्या. सी. एस. कर्णन यांची अखेर सहा महिन्यानंतर सुटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 07:34 PM2017-12-20T19:34:44+5:302017-12-20T19:45:09+5:30
न्यायालयीन अवमानाबद्दल सहा महिने तुरूंगवासाची शिक्षा झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्यायाधीश न्या. सी. एस. कर्णन यांची बुधवारी सुटका करण्यात आली.
कोलकाता : न्यायालयीन अवमानाबद्दल सहा महिने तुरूंगवासाची शिक्षा झालेले कोलकाता उच्च न्यायालयाचे वादग्रस्त माजी न्या. सी. एस. कर्णन यांची बुधवारी सुटका करण्यात आली.
न्या. सी. एस. कर्णन यांना न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली होती. त्यांना कोलकाता पोलिसांनी चेन्नईतील कोयम्बतूर येथून 20 जूनला अटक केली होती. न्या. सी. एस. कर्णन यांनी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालिन मुख्य न्यायमूर्ती जे. एस. केहर आणि इतर न्यायाधीशांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे असे आरोप करणे म्हणजे एकप्रकारे न्यायलयाचा अवमान असल्याचे न्यायमूर्ती जे. एस. केव्हर यांनी म्हटले होते. याप्रकरणी सात न्यायाधीशांच्या खंडपीठाने त्यांच्याविरोधात चौकशीचे आदेश दिले होते. न्या. सी. एस. कर्णन मूळचे चेन्नई उच्च न्यायालयाचे. तेथे त्यांनी अनेक वाद निर्माण केल्याने त्यांची कोलकाता उच्च न्यायालयात बदली केली गेली होती. तेथे बसूनही त्यांनी आपल्या वादग्रस्त उक्ती व कृतीचा सपाटा सुरु ठेवल्याने सर्वोच्च न्यायालयाने अखेर त्यांच्यावर ‘कन्टेप्ट ऑफ कोर्ट’चा बडगा उगारून सहा महिन्यांची शिक्षा ठोठावली होती.
Kolkata: Former Calcutta HC Judge, CS Karnan, released from Presidency Jail. He was arrested on 20th June and was later found guilty of contempt of Court. pic.twitter.com/UzaHNBffUk
— ANI (@ANI) December 20, 2017
दरम्यान, न्या. सी. एस. कर्णन यांची पत्नी सरस्वती आणि मुलगा सुगन त्यांच्या सुटकेच्यावेळी प्रेसिडेन्सी कारागृहात हजर होते. तसेच, त्यांचे जवळचे सहयोगी आणि वकील मॅथ्यू जे मेदुमपारा सुद्धा उपस्थित होते. यावेळी त्यांच्या पत्नी सरस्वती म्हणाल्या की, पुढील दहा दिवस आम्ही कोलकात्यातच थांबणार असून न्या. सी. एस. कर्णन यांच्या पेन्शनशी संबंधित काही औपचारिकता या दिवसांत पूर्ण करणार आहोत.