वाद चिघळणार! दोन देशांना जोडणाऱ्या 'मैत्री' पूलावरच आता नेपाळचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 07:08 PM2020-07-07T19:08:00+5:302020-07-07T19:14:00+5:30
भारत आणि नेपाळ सीमेवरच्या No Man's Land वर आता नेपाळने हक्क सांगायला सुरुवात केली आहे.
गेल्या महिन्याभरापासून चीनची फूस मिळाल्याने भारताविरोधात कारस्थाने रचण्यास सुरुवात केली आहे. भारताच्या भूभागांवर दावा साधून नवा नकाशा प्रसिद्ध करणाऱ्या नेपाळनं आता भारताला आणखी त्रास देण्यास सुरुवात केली आहे.
भारत आणि नेपाळ सीमेवरच्या No Man's Land वर आता नेपाळने हक्क सांगायला सुरुवात केली आहे. नेपाळ आणि भारताच्या सीमेजवळ रक्सौलमध्ये एक पूल आहे. मैत्री पूल असं नाव असलेला हा पूल दोन देशांना जोडतो. या पुलाचा भाग दोन्हीपैकी कुठल्याच देशाच्या मालकीचा नाही. त्यामुळे तो पूल नो मॅन्स लँड म्हणून ओळखला जातो. मात्र आता या पूलावर देखील नेपाळ पोलिसांनी नेपाळ हद्द सुरू असल्याचा फलक लावून नवा वाद ओढवला आहे.
नेपाळने भारताच्या भूभागावर दावा करणारे घटनादुरुस्ती विधेयक मंजूर केल्यानंतर नेपाळमधील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्ताधारी नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षात दोन गट निर्माण झाले असून भारतविरोधी भूमिका घेतल्यामुळे कम्युनिस्ट पक्षाचे दिग्गज नेते पुष्प कमल दहल प्रचंड नाराज असल्याचे समोर आले.
नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पंतप्रधानपदाच्या राजीनाम्यासाठी पक्षातंर्गत दबाव वाढू लागला आहे. पुष्प कमल दहल प्रचंड यांच्या दबावानंतर ओली यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा ही मागणी जोर धरु लागली आहे.
दरम्यान, केपी शर्मा ओली सत्ता वाचवण्यासाठी कोणत्याही पातळीपर्यंत जाऊ शकतात. ते नेपाळ कम्युनिस्ट पक्षात फूट पाडू शकतात त्याचसोबत कथित भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेलमध्येही पाठवू शकतात असा आरोप त्यांनी केला आहे. मात्र अलीकडेच नेपाळ सरकारने जे निर्णय घेतले त्यानंतर सरकार पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यात भारताचाही हात आहे. लिपुलेख, कालापानी व लिम्पियाधुरा हे भारताचे तीन भाग नेपाळच्या नकाशात समाविष्ट केल्यानंतर त्यांना हटविण्याच्या हालचारी सुरू झाल्या आहेत. त्यात नेपाळचे काही नेतेही सामील आहेत. पक्षाच्या मागील मंगळवारी झालेल्या बैठकीत प्रचंड यांचा आरोप योग्य नाही, असे मत ओली यांच्याकडून मांडण्यात आले होते.