ओतूर महाविद्यालयात आविष्कार संशोधन व्याख्यानमाला संपन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2015 01:47 AM2015-09-10T01:47:30+5:302015-09-10T17:57:28+5:30
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सन २०१५ हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर (ता. जुन्नर) येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळ (बीसीयूडी) यांच्या सहकार्याने ओतूर महाविद्यालयाने एकदिवसीय (आविष्कार) संशोधन मार्गदर्शन व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
ओतूर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे सन २०१५ हे अमृतमहोत्सवी वर्ष आहे. त्यानिमित्त अण्णासाहेब वाघिरे महाविद्यालय ओतूर (ता. जुन्नर) येथे सावित्रीबाई फुले विद्यापीठ व महाविद्यालय विकास मंडळ (बीसीयूडी) यांच्या सहकार्याने ओतूर महाविद्यालयाने एकदिवसीय (आविष्कार) संशोधन मार्गदर्शन व्याख्यानमालेचे आयोजन केले होते.
विद्यापीठाच्या महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळाचे विशेषाधिकारी डॉ. रवींद्र जॉयभाय व सुप्रसिद्ध मानवशास्त्रज्ञ डॉ. राम गंभीर उपस्थित होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य शिवराज कुकाळे होते. व्याख्यानमालेसाठी नवनियुक्त उपप्राचार्य एस. एफ. ढाकणे, प्रा. डॉ. जी. एन. डुंबरे, महाविद्यालयाचे शैक्षणिक व संशोधक समन्वयक डॉ. एस. आर. रहांगडाले, प्रा. एम. बी. राठोड, जुन्नर तालुक्यातील सर्व महाविद्यालयांतील १०२ विद्यार्थी, ४० प्राध्यापक, महाविद्यालयाचे इच्छुक ४० संशोधक विद्यार्थी, विज्ञान शाखेचे प्राध्यापक उपस्थित होते.
जॉयभाय म्हणाले, की महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी समाजातील व सभोवतालचे सामाजिक, आर्थिक, पर्यावरणीय, शेतीविषयक, ऊर्जाविषयक, शास्त्रीय इ. मूलभूत प्रश्न किंवा सर्वसामान्यांच्या दैनिक गरजा, समस्यांचे वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करून त्याचे निराकरण करण्यासाठी शास्त्रीय उपाययोजना शोधावी. यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांच्या वतीने दरवर्षी आविष्कार संशोधन प्रकल्प सादरीकरणासाठी स्पर्धा घेण्यात येते. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना व कल्पनांना व्यक्त करून त्याचे सादरीकरण करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
संशोधनासाठी काही पायर्या आहेत. त्यात पहिली पायरी पूर्वतयारी. दुसरी पायरी प्रकल्पाची संशोधन पद्धती. संशोधन पद्धतीनंतर संशोधनाचा कच्चा-पक्का आराखडा. आराखड्यानुसार कार्य केल्यावर येणारी निरीक्षणे करून निष्कर्ष काढावेत. विश्लेषण पद्धतीनं साखळी पद्धतीचा वापर करून सिद्धांत मांडावे.
या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प डॉ. राम गंभीर यांनी गुंफले. त्यांनी मानवशास्त्र, सामाजिक शास्त्रातील संशोधन कार्य, त्यांची संशोधन पद्धती तसेच या संशोधनाचे सामाजिक, आर्थिक, भौगोलिक, राजकीय दृष्टिकोनातून स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर होणारे सकारात्मक व नकारात्मक परिणाम विशद केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दोन्ही व्याख्यात्यांनी सविस्तर उत्तरे दिली.
व्याख्यानमालेचे अध्यक्ष प्राचार्य शिवराज कुकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी ओतूर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी कोणकोणते उपक्रम राबविले, त्याची सविस्तर माहिती देऊन व्याख्यात्यांना धन्यवाद दिले. या व्याख्यानमालेचे आयोजक महाविद्यालयाचे शैक्षणिक व संशोधक समन्वय डॉ. एस. आर. रहांगडाले यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांचा परिचय करून दिला. (जोड आहे.......)