Lokmat Parliamentary Award: लोकमत संसदीय पुरस्कारांचे उद्या दिल्लीत वितरण; माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 06:13 AM2023-03-13T06:13:13+5:302023-03-13T06:14:20+5:30
दिल्लीतील संसद मार्गावरील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी साडेचार वाजता हा शानदार सोहळा होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत होणार असून ते या समारंभाला मुख्य पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
दिल्लीतील संसद मार्गावरील एनडीएमसी कन्व्हेन्शन सेंटरमध्ये दुपारी साडेचार वाजता हा शानदार सोहळा होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय लघु, माध्यम व सूक्ष्म उद्योगमंत्री नारायण राणे, काँग्रेसचे अध्यक्ष व राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे, राज्यसभेचे उपसभापती हरीवंश नारायण सिंग, दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
व खासदार शरद पवार, माजी केंद्रीय मंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरलीमनोहर जोशी उपस्थित राहणार आहेत.
लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह
या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात ‘लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह’ आयोजित केला आहे. ‘भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ’ (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडणार आहेत. यात केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी, केंद्रीय कायदा व न्याय मंत्री किरेन रिजीजू, केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री अनुराग सिंग ठाकूर, केंद्रीय परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार दिग्विजय सिंग, सीपीएमचे महासचिव सीताराम येचुरी, भाजपचे खासदार सुधांशू त्रिवेदी, शिवसेना ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी सहभागी होणार आहेत.
- सर्वाधिक विश्वासार्हतेचे प्रतिष्ठित लोकमत संसदीय पुरस्कार दरवर्षी आठ वेगवेगळ्या श्रेणींमध्ये (चार लोकसभा व चार राज्यसभा) उत्कृष्ट संसद सदस्यांना त्यांच्या योगदानासाठी दिले जातात.
- विजेत्यांची निवड करण्यासाठी सर्व खासदारांच्या २०२० आणि २०२१ या वर्षातील संसदीय योगदानाचा ज्युरी बोर्डाने अभ्यास केला.
पुरस्काराचे मानकरीः मल्लिकार्जुन खरगे, भर्तृहरी महताब, असदुद्दीन ओवेसी, डेरेक ओ’ब्रायन, वंदना चव्हाण, तेजस्वी सूर्या, मनोजकुमार झा, लॉकेट चॅटर्जी.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"