विधानसभा निवडणुकांच्या तिकीट वाटपात, महिलांसाठी सर्वांनीच आखडला हात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2018 06:25 PM2018-11-21T18:25:28+5:302018-11-21T18:26:30+5:30
महिलांना राजकारणात आरक्षण देण्याचा विषय चर्चेला आल्यास सर्वच पक्ष हात वर करुन पंसती दर्शवतात.
हैदराबाद - तेलंगणातीलविधानसभा निवडणुकांमध्ये तिकीट वाटपात महिलांना जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याचे दिसत आहे. विशेष म्हणजे सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना तिकीट देताना आपला हात आखडता घेतला आहे. काँग्रेसकडून 100 उमेदवारांपैकी केवळ 11 महिलांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तर तेलंगणा राष्ट्र समितीने केवळ चारच महिलांना निवडणुकांच्या रिंगणात उतरवले आहे.
महिलांना राजकारणात आरक्षण देण्याचा विषय चर्चेला आल्यास सर्वच पक्ष हात वर करुन पंसती दर्शवतात. मात्र, प्रत्यक्षात तिकीट वाटपाची वेळ येते तेव्हा हेच हात मागे सरकतात. तेलंगणा विधानसभा तिकीट वाटपावेळीही असेच घडले आहे. तेलंगणा विधानसभेच्या पहिल्या निवडणुकीत 2014 साली टीआरएसने 6 महिलांना उमेदवारी दिली होती. मात्र, यंदा केवळ चारच महिलांना तिकीट देण्यात आले आहे. तर स्वतंत्रपणे निवडणूक लढविणाऱ्या भाजपाने 14 महिलांना उमेदवारी दिली आहे. तर हैदराबादच्या 8 जागांवर निवडणूक लढविणाऱ्या एमआयएमने एकही महिला उमेदवार दिला नाही. माकपाच्या नेतृत्वातील बहुजन लेफ्ट फ्रंटने 1 समलैंगिकसमवेत 10 महिलांना तिकीट दिले आहे.
महिलांना तिकीट देण्याच्या मुद्द्याबाबत बोलताना काँग्रेसच्या स्टार प्रचारक खुशबू यांनी म्हटले की, संसदेत महिला आरक्षणाचे विधेयक आणण्यासाठी प्रयत्न करणारा काँग्रेस हा पहिला पक्ष आहे. मात्र, सत्तारुढ रालोआ हे विधेयक पारित करू इच्छत नाही. तर तेलंगणा भाजपच्या प्रमुख प्रवक्त्यांनी जागा वाटपात पक्षाकडून सामाजिक संतूलनाचा विचार करण्यात येत नसल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, काँग्रेस आघाडीतील तेलुगू देसम पक्षाने त्यांच्या वाट्यातील 14 पैकी एका जागेवर महिला उमेदवार उभा केला आहे. पण, त्याही मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्या कन्या सुहासिनी याच आहेत.