जिल्हाधिकाऱ्याने केली आत्महत्या, आयुष्याला कंटाळून केले कृत्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 01:51 AM2017-08-12T01:51:01+5:302017-08-12T01:51:11+5:30
बिहारच्या बक्सरचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पांडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
गाझियाबाद : बिहारच्या बक्सरचे जिल्हाधिकारी मुकेश पांडे यांनी जीवनाला कंटाळून आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत असून, मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पांडे यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे. गाझियाबाद रेल्वे रुळांवर मुकेश पांडे गुरुवारी रात्री मृतावस्थेत आढळले. याच ठिकाणी पोलिसांना एक चिठ्ठी आढळली आहे.
गाझियाबाद रेल्वे स्टेशनपासून एक किलोमीटर दूर रेल्वे रुळांवर वरिष्ठ आयएएस अधिकारी मुकेश पांडे यांचा मृतदेह आढळला. ते २०१२च्या तुकडीतील
आयएएस अधिकारी होते. आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत त्यांनी जीवनाला वैतागलो असून, अस्तित्वावरचा माझा विश्वास उडाला आहे, असे नमूद केले आहे.
मी पश्चिम दिल्लीतील जनकपूरमधील डिस्ट्रिक्ट सेंटर परिसरातील एका इमारतीच्या १०व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या करीत आहे. जीवनाला मी वैतागलो असून, मानवी अस्तित्वावरील माझा विश्वास उडाला आहे. एक सविस्तर चिठ्ठी दिल्लीतील एका पंचतारांकित हॉटेलातील खोली क्रमांक ७४२मध्ये बॅगेत ठेवली आहे. कृपया, मला माफ करा. सर्वांवर माझे प्रेम आहे. स्वखुशीने मी आत्महत्या करीत आहे. माझा मृतदेह मिळाल्यानंतर नातेवाइकांना कळवा, असेही त्यांनी चिठ्ठीत नमूद करून काही फोन नंबरही दिले आहेत, असे वरिष्ठ पोलीस अधीक्षक एच. एन. सिंह यांनी सांगितले. मात्र त्यांचा मृतदेह रेल्वे रुळांवर सापडला.
तथापि, पांडे यांनी आत्महत्या कधी आणि कशी केली, हे स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर ते कळेल, असेही सिंह यांनी सांगितले. मुकेश पांडे कार्यक्षम प्रशासक आणि संवेदनशील अधिकारी होते. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशा भावना नितीश कुमार यांनी टिष्ट्वटरवर व्यक्त केल्या आहेत.
२०१२च्या तुकडीचे आयएएस अधिकारी मुकेश पांडे यांनी अलीकडेच बक्सरच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली होती. जिल्हा दंडाधिकारी म्हणून त्यांची ही पहिलीच नियुक्ती होती. याआधी ते कटिहार येथे उपविकास आयुक्त (डीडीसी) होते. (वृत्तसंस्था)
आत्महत्येची होती माहिती
कोटगावनजीक रेल्वे रुळांवर त्यांचा मृतदेह आढळला. दिल्लीच्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने सांगितले की, पांडे यांच्या मित्रांकडून ते आत्महत्या करणार असल्याची माहिती मिळाली होती.
ते पश्चिम दिल्लीतील एका मॉलमध्ये गेले आहेत, असे सांगण्यात येताच पोलीस पथक तत्काळ मॉलकडे रवाना करण्यात आले. तथापि, ते तेथे नव्हते.
सीसीटीव्ही फूटेजवरून ते मॉलमधून
निघून जवळच्या मेट्रो स्टेशनकडे जात असल्याचे दिसते. प्रशासकीय अधिकाºयांना त्यांच्या मृत्यूने धक्काच बसला.