पंतप्रधान मोदींच्या वडोदरामधील रॅलीसाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गुजरात सरकारकडे 80 लाखांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2017 05:35 PM2017-09-06T17:35:03+5:302017-09-06T17:38:01+5:30
वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे.
वडोदरा, दि. 6- वडोदराचे जिल्हाधिकारी पी. भारती यांनी मंगळवारी ‘सरदार सरोवर नर्मदा निगम’ या सरकारी विभागाला विशेष पत्र लिहून ७५ लाख रुपयांची मागणी केली आहे. मोदींच्या वाढदिवसाच्या दिवशी म्हणजेच 17 सप्टेंबर रोजी नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं आहे. या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदीही सहभागी होणार आहे. या रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या दीड लाख लोकांना अन्नाची पाकिटं वाटण्यासाठी हे पैसे हवे असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रात म्हंटलं आहे. इंडियन एक्स्प्रेसने ही बातमी दिली आहे.
वडोदराच्या ‘डबोही’ इथे १७ सप्टेंबर रोजी ही रॅली होणार आहे. या रॅलीत मोदी स्वतः उपस्थितीत राहणार असल्यामुळे रॅलीत लोक मोठ्या संख्येने सहभागी होतील, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. तसंच सामान्य कार्यकर्त्यांबरोबरच अनेक प्रसिद्ध व्यक्तीही या रॅलीत सहभाग घेणार आहेत. त्यामुळे व्हीव्हीआयपी व्यक्तींच्या जेवणासाठी अतिरिक्त ५ लाख रुपयांचा निधीही जिल्हाधिकाऱ्यांनी मागितला आहे. हा सर्व खर्च तब्बल ८० लाख इतका होऊ शकतो . १७ सप्टेंबरला नर्मदा महोत्सवासाठी एका रॅलीचं आयोजन करण्यात आल्याचं जिल्हाधिकारी भारती यांनी सरकारी विभागाला पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे. १७ सप्टेंबरला पंतप्रधान मोदी यांचाही वाढदिवस असतो. त्यामुळे ही रॅली नेमकी आहे कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जातो आहे.
दरम्यान, मोदींच्या या रॅलीसाठी विविध जिल्ह्यांमधून दीड लाख लोक येणार आहेत. या लोकांना राज्य परिवहन विभागाच्या १८०० बसेसमधून रॅलीच्या ठिकाणी आणण्यात येईल. हा सगळा खर्च जिल्हा प्रशासनाला उचलावा लागणार आहे. प्रत्येकासाठी अन्नाची पाकीटं आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. यासाठी प्रती व्यक्ती ५० रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी भारती यांना विचारलं असता, आम्ही फक्त सरकारला निधी देण्याची विनंती केल्याचं त्यांनी सांगितलं.