महाराष्ट्राचे जोशी चंदीगडचे जिल्हाधिकारी
By admin | Published: October 12, 2015 10:37 PM2015-10-12T22:37:53+5:302015-10-12T22:37:53+5:30
महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले मूळचे सोलापूरचे अजित जोशी यांची पंजाब व हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडच्या जिल्हाधिकारीपदी पंतप्रधान कार्यालयाने नियुक्ती केली आहे.
नवी दिल्ली : महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले मूळचे सोलापूरचे अजित जोशी यांची पंजाब व हरियाणाची राजधानी असलेल्या चंदीगडच्या जिल्हाधिकारीपदी पंतप्रधान कार्यालयाने नियुक्ती केली आहे.
जोशी हे २००३ च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. यूपीएससीच्या परीक्षेत महाराष्ट्रात अव्वल, तर देशात २९ वा क्रमांक मिळविणाऱ्या जोशी यांची गेल्या १२ वर्षांची प्रशासकीय कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. ऐतिहासिक पानिपतावर पहिली पोस्टिंग झालेल्या जोशी यांनी महाराष्ट्र व हरियाणातील सांस्कृतिक बंध वृद्धिंगत करण्यासाठी पानिपत महोत्सव सुरू केला. गोहानातील दलित हत्याकांड अत्यंत कौशल्याने हाताळल्यामुळे त्यांच्या कामाची दखल देशपातळीवर घेतली गेली. झज्जर या देशातील सर्वाधिक वीटभट्ट्या असलेल्या जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असताना जोशी यांनी वीटभट्ट्यांवर काम करणाऱ्या स्थलांतरित मजुरांच्या मुलांसाठी सुरू केलेल्या भट्टाशाळेचे तर दस्तुरखुद्द माजी राष्ट्रपती दिवंगत अब्दुल कलाम यांनी कौतुक केले होते. सध्या जिंदचे जिल्हाधिकारीपद सांभाळत असलेल्या अजित जोशी यांच्या या कामगिरीची दखल घेऊन पंतप्रधान कार्यालयाने त्यांची चंदीगडसारख्या अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी जिल्हाधिकारीपदासाठी नियुक्ती केली आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)