15 ऑगस्ट दिनी महाराष्ट्र कन्येला बहुमान, सेलमच्या जिल्हाधिकारी जगभर झळकणार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2019 06:25 PM2019-07-22T18:25:31+5:302019-07-22T18:32:29+5:30
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कन्या आणि तामिळनाडूतील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे
मुंबई - 'नॅशनल जिओग्राफी' या वृत्तवाहिनीवरुन 15 ऑगस्ट रोजी भारतीय लोकशाहीच्या निवडणुक प्रक्रियेची माहिती जगाला दाखवण्यात येणार आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशातील निवडणूक प्रक्रिया आणि त्याची अंमलबजावणी कशी होते, याबाबतचा एक माहितीपट या वृत्तवाहिनीवरुन जगाला दाखवण्यात येणार आहे.
'द ग्रेट इंडियन इलेक्शन' या माहितीपटाद्वारे देशातील निवडणूक प्रक्रियेची माहिती जगाला दाखविण्यात येणार आहे. या माहितीपटाद्वारे जगाला आपली निवडणूक प्रक्रिया समाजावून सांगण्यासाठी देशातून दोन आयएएस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्र कन्येला संधी मिळाली आहे. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कन्या आणि तामिळनाडूतील सेलमच्या जिल्हाधिकारी रोहिणी भाजीभाकरे यांची या निवेदनासाठी निवड झाली आहे. तर, दुसरे आयएएस अधिकारी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाराणसी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सुरेंद्र सिंग असणार आहेत.
सेलम जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी म्हणून रोहिणी भाजीभाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी बनून काम पाहिलं. त्याचा आपणास अभिमान वाटतो, तर देशातील निवडणूक प्रक्रिया जगाला समाजावून सांगण्याची संधी मिळणे ही सेलम जिल्ह्यातील कामाची पावती असल्याचे रोहिणी भाजीभाकरे यांनी म्हटले आहे. भारतात नुकतेच 17 व्या लोकसभा निवडणुकांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. ईव्हीएम मशिनद्वारे देशातील 545 मतदारसंघात मतदान घेण्यात आले. कोट्यवधी नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावत नवीन सरकार स्थापन केले. यावेळीही जनतेनं मोदींच्या नेतृत्वाला संधी दिली आहे.
निवडणूक आयोगाने सरकारी कर्मचारी आणि देशातील सुरक्षा रक्षकांना सोबत घेऊन शांततेत आणि अतिशय सहजतेनं ही निवडणूक प्रक्रिया पार पाडली. निश्चितच भारतासारख्या विशाल लोकसंख्या असलेल्या देशातील निवडणूक प्रकिया ही जगभरातील लोकांसाठी उत्सुकतेचा विषय आहे. कारण, न्यूटन चित्रपटात दाखवलेल्या आदिवासी बहुल भागांपासून ते दिल्लीच्या हाय प्रोफाईल लोकांपर्यंत सर्वच मतदारांनी त्यादिवशी आपला मतदानाचा हक्क बजावला. सुरक्षा यंत्रणा, ईव्हीएम प्रणाली, व्हीपॅटपॅट प्रणाली, निवडणूक आयोगाची नियमावली, आचारसंहिता यांसह बारीकसारीक गोष्टींचे नियोजन या मतदानप्रक्रियेवेळी करावे लागते. त्यामुळेच, जगभरातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या निवडणूप्रकिया एक संशोधनाचा विषय आहे.