शंकरनगर, सांगोला संघाची नेत्रदीपक कामगिरी जिल्हा शालेय बास्केटबॉल स्पर्धा
By admin | Published: August 31, 2014 10:51 PM2014-08-31T22:51:53+5:302014-08-31T22:51:53+5:30
अकलूज :
Next
अ लूज :सोलापूर जिल्हा शालेय बास्केटबॉल स्पर्धेत महर्षी प्रशाला शंकरनगर व विद्या मंदिर सांगोला या संघांनी नेत्रदीपक कामगिरी करत यश संपादन केले. सोलापूर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश स्कूल व ज्यु. कॉलेज शंकरनगर यांच्या संयुक्त विद्यमाने विजयसिंह मोहिते-पाटील क्रीडा संकुलात जिल्हास्तरीय शालेय बास्केटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा क्रीडा अधिकारी जुबेर शेख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी शिवरत्न शिक्षण संस्थेचे सचिव शिवदास शिंदे, प्राचार्य झेड. एस. दोहोदवाला, प्रताप क्रीडा मंडळाचे अनिल जाधव, महेश ढेंबरे व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते. या स्पर्धेत अकलूज, सांगोला, पंढरपूर व बार्शी येथील संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धा 14, 17 व 19 वर्षे वयाच्या मुले व मुलींच्या गटात घेण्यात आल्या. 14 वर्षीय गट मुलांमध्ये महर्षी प्रशाला, शंकरनगरने सांगोला विद्यामंदिरचा 32 विरूध्द 24 असा 8 गुणांनी पराभव केला. मुलींच्या गटात जिजामाता कन्या प्रशाला, अकलूजने शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश स्कूलचा 11 विरूध्द 8 असा 3 गुणांनी पराभव केला. 17 वर्षीय मुलांच्या गटात सांगोला विद्यामंदिर, सांगोला संघाने शंकरराव मोहिते-पाटील इंग्लिश स्कूलचा 22 विरूध्द 5 असा 17 गुणांनी पराभव केला. मुलींच्या गटात महर्षी शंकरराव मोहिते-प्रशालेने सांगोला विद्यामंदिर, सांगोलाचा 6 विरूध्द 2 असा 4 गुणांनी पराभव केला. 19 वर्षांखालील मुलांच्या गटात सदाशिवराव माने विद्यालय, अकलूजने महर्षी शंकरराव मोहिते प्रशालेचा 21 विरूध्द 14 असा 7 गुणांनी पराभव केला. मुलींच्या गटात सांगोला विद्यामंदिर, सांगोला हा एकच संघ असल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले. या स्पर्धेसाठी क्रीडा विभाग प्रमुख चंद्रकांत कांबळे, अनिल जाधव, महेश ढेंबरे, विशाल ढेंबरे, लखन मोरे, प्रदीप पांढरे, शशांक गायकवाड यांनी पंचाचे काम केले. (वार्ताहर)