कॅनव्हासवर अवतरले कृष्णाचे दैवी स्वरूप

By admin | Published: October 6, 2015 01:56 AM2015-10-06T01:56:44+5:302015-10-06T01:56:44+5:30

कलेला कुठल्याही परिचयाची गरज नसते. ती स्वत: बोलते. सुप्रसिद्ध चित्रकार अर्चना श्रीवास्तव यांच्या दिल्लीच्या रवींद्र भवनात आयोजित चित्रप्रदर्शनात नेमके हेच बघायला मिळते.

The divine form of Avatarla Krishna on the canvas | कॅनव्हासवर अवतरले कृष्णाचे दैवी स्वरूप

कॅनव्हासवर अवतरले कृष्णाचे दैवी स्वरूप

Next

- शीलेश शर्मा,  नवी दिल्ली
कलेला कुठल्याही परिचयाची गरज नसते. ती स्वत: बोलते. सुप्रसिद्ध चित्रकार अर्चना श्रीवास्तव यांच्या दिल्लीच्या रवींद्र भवनात आयोजित चित्रप्रदर्शनात नेमके हेच बघायला मिळते. दैवी प्रतिभेच्या धनी असलेल्या अर्चनांच्या कुंचल्यातून साकारलेल्या कृष्णाच्या दैवी लीला मनाला मोहून टाकतात.
भगवान कृष्णाची विविध रूपे, त्याच्या लीलांवर आधारित या प्रदर्शनात अर्चना यांनी आपल्या कुंचल्यातून कान्हा, अचला, अच्युता, आदित्य, अनिरुद्ध, देवेश, गोपाल, गोविंद, कमलनयन, जनार्दन जगन्नाथ अशा अनेक नावाने ओळखल्या जाणाऱ्या गोपाळाची मनमोहक रूपे कॅनव्हासवर साकारलेली बघायला मिळतात. ‘डिव्हिनिटी’ या नावाने सजलेल्या या चित्रप्रदर्शनातील भगवान कृष्णाची विविध रूपे अक्षरश: खिळवून ठेवतात.
अर्चना श्रीवास्तव यांची कला त्यांचे पती मनुकुमार श्रीवास्तव यांच्याशिवाय कदाचित ‘राधेविना कृष्ण अधुरा’ तशीच ‘अधुरी’ असती. अर्चना आणि मनुकुमार एकमेकांना पूरक आहेत. मनुकुमार यांचा पाठिंबा आणि अर्चना यांचा करिश्मा नेमका हाच मिलाफ अर्चनांनी कॅनव्हासवर साकारलेल्या चित्रांमध्येही दिसतो. या चित्रप्रदर्शनाला कलाप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
दशावतार तैलिय चित्रकथेत अर्चना यांनी ईश्वराची १० रूपे दर्शवली आहेत. राधा-कृष्ण शीर्षक असलेले चित्र स्वत: अर्चना यांच्या अतिशय आवडीचे आहे. ६९ इंच लांब आणि ५८ इंच रुंद कॅनव्हॉसवर ते साकारले आहे. प्रदर्शनातील प्रत्येक चित्र चित्रकार अर्चना यांच्या कल्पनाशक्तीसोबतच सर्जनशीलतेची साक्ष देणारे आहे. राधा यमुनेतिरी बसली आहे. यमुनेच्या शीतल, शांत, निळ्याशार पाण्यात तिचे प्रतिबिंब पडले आहे. पण राधेला त्या ठिकाणी स्वत:ची नाही, तर कृष्णाची मनोहारी छबी दिसते, हे चित्र डोळ्यांचे पारणे फेडते.
राधा-कृष्णाच्या या प्रेमाची मनोहारी कल्पना करणे आणि नंतर ते कॅनव्हासवर साकारण्याचे कौशल्य अर्चना यांना तंतोतंत साधले आहे.
अर्चनांच्या अन्य कलाकृतींमध्ये गोवर्धन लीला, कृष्णाचे विराट रूप, पाच इंद्रिये व आत्मा, हनुमान यांसारख्या पेंटिंगना चित्रप्रेमींकडून विशेष दाद मिळत आहे.

Web Title: The divine form of Avatarla Krishna on the canvas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.