राष्ट्रीय महिला खेळाडूला मुलगी झाली म्हणून तलाक
By admin | Published: April 24, 2017 12:47 AM2017-04-24T00:47:10+5:302017-04-24T00:47:10+5:30
नेटबॉल या खेळात सात वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकाविलेल्या शुमयाला जावेद या महिला खेळाडूने तिला मुलगी झाली म्हणून पतीने ‘ट्रिपल तलाक’ दिल्याचा
अमरोहा (उत्तर प्रदेश) : नेटबॉल या खेळात सात वेळा राष्ट्रीय अजिंक्यपद पटकाविलेल्या शुमयाला जावेद या महिला खेळाडूने तिला मुलगी झाली म्हणून पतीने ‘ट्रिपल तलाक’ दिल्याचा आरोप केला आहे.
उत्तर प्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यात माहेर असलेल्या शमयाला हिचे लखनऊच्या गोसाईगंज भागात राहणाऱ्या आझम अब्बासी यांच्याशी सन २०१४ मध्ये लग्न झाले होते.
माहेरच्या घरी एका वृत्तसंस्थेशी बोलताना शुमायला हिने पती आणि सासरच्या मंडळींनी आधी आपला हुंड्यासाठी छळ केला व गरोदर राहिल्यावर पोटातील गर्भ मुलीचा आहे हे आठव्या महिन्यात केलेल्या सोनोग्राफीवरून स्पष्ट झाल्यावर आपल्याला घरातून हाकलून दिले, असा आरोप केला.
शुमयाला हिने सांगितले की, ९ फेब्रुवारी २०१४ रोजी अब्बासी यांच्याशी माझे लग्न झाले. सुरुवातीपासूनच सासरी माझा हुंड्यासाठी शारीरिक व मानसिक छळ सुरू केला गेला. वडिलांकडून पैसे आण, असा त्यांचा सारखा तगादा सुरू असे. हे कळल्यावर वडिलांनी जून व सप्टेंबर २०१४ मध्ये आधी दोन लाख व नंतर एक लाख रुपये सासरच्या लोकांना दिले. तरी त्यांचे समाधान झाले नाही. माझ्या नणंदेने तर मला एकदा जाळण्याचाही प्रयत्न केला, असा शुमयाला हिचा आरोप आहे.