व्हॉटसअपवरुन दिला तलाक, अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापकाच्या पत्नीचा मोदींकडे याचना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 07:01 PM2017-11-12T19:01:38+5:302017-11-12T19:06:04+5:30
आग्रा : अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील एका प्राध्यापकानेच आपल्या पत्नीला व्हॉटस अपवरुनच तलाक दिला आहे. या प्राध्यापकाच्या पत्नीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच न्याय मिळण्यासाठी याचना केली आहे.
आग्रा : अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील एका प्राध्यापकानेच आपल्या पत्नीला व्हॉटस अपवरुनच तलाक दिला आहे. या प्राध्यापकाच्या पत्नीने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडेच न्याय मिळण्यासाठी याचना केली आहे.
सर्वोच्च न्यायालयाने तिहेरी तलाकच्या विरोधात निकाल देउनही या प्रकारावर प्रतिबंध बसलेला दिसत नाही. तीन महिन्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधिशांच्या खंडपीठाने तिहेरी तलाक देण्यावर प्रतिबंध घातला होता. आता उत्तर प्रदेशातील अलिगढ येथील हा प्रकार उघडकीस आला आहे.
अलिगढ मुस्लिम विद्यापीठातील प्राध्यापकाच्या या पत्नीने आपल्याला आधी व्हॉटस अपवरुन आणि नंतर एसएमएसद्वारे आपल्या पतीने तलाक दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे न्याय देण्याची मागणी केली आहे.
संस्कृत विभागप्रमुख असलेले खालिद बिन युसूफ खान या विद्यापीठात गेली २७ वर्षे शिकवित आहेत. त्यांची पत्नी यासमीन यांनी पतीविरुध्द आरोप केला आहे. आपल्याला जर ११ डिसेंबरपर्यंत न्याय मिळाला नाही तर आपण कुलगुरुंच्या निवासस्थानाबाहेर तीन मुलांसह आत्महत्या करु. मला घराबाहेर काढलेले आहे, मी तेव्हापासून भटकत आहे. परंतु अजून कोणीही मदत केलेली नाही.
दरम्यान, अलिगढ पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंद करुन घेतला आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, मला न्याय द्या या आशयाचा फलक यासमीनच्या हातात होता.