तलाकपीडितेवर अॅसिड हल्ला; सोमवारी सुनावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2018 02:05 AM2018-09-15T02:05:03+5:302018-09-15T02:05:25+5:30
उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमधील प्रकरण
नवी दिल्ली : निकाह हलाला आणि तोंडी तलाकच्या खटल्यात याचिका केलेल्या महिलेवर गुरुवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरमध्ये अॅसिड हल्ला झाला. तिने संरक्षणासाठी केलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने १७ सप्टेंबर रोजी सुनावणी घेण्यास शुक्रवारी संमती दिली.
सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ शबनम राणी यांच्या याचिकेवर सुनावणी घेणार आहे. खंडपीठात ए. एम. खानविलकर आणि डी. वाय. चंद्रचूड यांचा समावेश आहे. शबनम राणी यांच्यावर त्यांच्या दिराने हल्ला केला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राणी यांनी माझ्यावर चांगले उपचार व्हावेत अशीही मागणी केली आहे. शबनम राणी यांचे वकील अश्विनीकुमार उपाध्याय यांना न्यायालयाने याचिकेची प्रत केंद्र सरकार आणि उत्तर प्रदेश सरकारकडे सादर करण्यास सांगितले.
काय आहे आरोप?
शबनम राणी यांनी निकाह हलाला आणि बहुपत्नीत्वविरुद्ध केलेल्या याचिकेत माझ्या पतीने मला तोंडी (ट्रिपल) तलाक देऊन दिरासोबत निकाह हलाला करण्यास भाग पाडले, असा आरोप केला आहे.