नागपूरच्या दिव्या देशमुखने बुद्धीबळातलं जागतिक सुवर्णपदक पटकावत रचला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 03:01 PM2017-09-02T15:01:35+5:302017-09-02T18:20:55+5:30
मुंबई, दि. 2 - दिव्या देशमुख या नागपूरच्या 11 वर्षांच्या मुलीने ब्राझिलमध्ये झालेल्या 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत ...
मुंबई, दि. 2 - दिव्या देशमुख या नागपूरच्या 11 वर्षांच्या मुलीने ब्राझिलमध्ये झालेल्या 12 वर्षांखालील वर्ल्ड कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवून इतिहास रचला आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेमध्ये 19 भारतीय खेळाडू सहभागी झाले होते, परंतु केवळ दिव्या पदक मिळवू शकली आणि ते देखील सुवर्णपदक. मुलींच्या श्रेणीमध्ये झालेल्या 11 च्या 11 फेऱ्यांमध्ये दिव्या अपराजित राहिली आणि 9.5 गुण तिने मिळवले.
तिने एकूण 8 सामने जिंकले तर 3 सामने अनिर्णित राहिले. अमेरिकेच्या नतास्जा मेटस या खेळाडूपेक्षा एक गुण जास्त मिळवत दिव्या अव्वल स्थानावर राहिली. दिव्याच्या खालोखाल बारताने केलेल्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये रक्षिता रावीने आठवे स्थान मिळवले. तर रोहीत कृष्णा एस याला 11 व्या स्थानावर समाधान मानावे लागले. भाग्यश्री पाटील 6.5 गुणांसह 15व्या तर ज्ञाना पाटील 6 गुणांसह 18 व्या स्थानावर राहिली.
या स्पर्धेआधी 11 वर्षांच्या दिव्याने चांगली कामगिरी करताना ब्लिट्झ प्रकारामध्ये सुवर्ण, रॅपिडमध्ये रौप्य तर उझबेकिस्तानमधल्या आशियाई युथ चँपियनशिप स्पर्धेत कास्य पदक मिळवले होते. गेल्या वर्षी नवी दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ स्पर्धेमध्ये दिव्याने सुवर्णपदक जिंकले होते.
आत्तापर्यंत केलेल्या चमकदार कामगिरीनंतर आता दिव्या देशमुखच्या शिरपेचात 12 वर्षांखालील जागतिक कॅडेट बुद्धीबळ स्पर्धेत सुवर्ण पदकाचा तुरा रोवला गेला आहे. 2014 मध्ये तिने 10 वर्षांखालील वर्ल्ड युथ चेस चँपियनशिप स्पर्धेत डरबानमध्ये सुवर्णपदक मिळवले होते.
दिव्या ही स्त्रीरोग तज्ज्ञ असलेल्या जितेंद्र व नम्रता देशमुख या दांपत्याची मुलगी असून चेन्नईतील आर. बी. रमेश यांच्या चेस गुरूकुल अकादमीची विद्यार्थिनी आहे. दिव्याचं कौतुक करताना, ती अत्यंत मेहनती खेळाडू असल्याचे रमेश म्हणाले. गेली दोन ते तीन वर्षे ती चेस गुरुकूलमध्ये प्रशिक्षण घेत आहे. दिव्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असून ती कुठल्याही दडपणाविना बुद्धीबळ खेळते असे मतही त्यांनी व्यक्त केले आहे. या जेतेपदाचा दिव्याला तिच्या करीअरसाठी चांगला उपयोग होईल असेही रमेश यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले.
तर दिव्याची मेहनत फळाला आल्याची भावना दिव्याची आई नम्रता यांनी व्यक्त केली आहे. रमेश यांच्याकडील प्रशिक्षणाचाही फायदा झाल्याचे त्या म्हणाल्या.