By-Election Result: भाजपाला दिवाळी 'कडू'! पोटनिवडणुकांत जिकडे तिकडे जिंकले विरोधक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 06:29 AM2021-11-03T06:29:48+5:302021-11-03T06:30:20+5:30
प्रादेशिक पक्ष व काँग्रेस यांना झाला फायदा. पाेटनिवडणुकांत तृणमूलकडून भाजपचा पराभव, लालू यांच्या पक्षाला धक्का.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकांच्या निकालांतून पुन्हा अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा करिश्मा कायम आहे आणि जिथे ते नाहीत, तिथेच भाजप व काँग्रेस यांच्यात सामना झाला आणि काही प्रमाणात काँग्रेसला यश मिळू शकले, असे स्पष्ट झाले.
पश्चिम बंगालमध्ये चारही जागांवर तृणमूलने मुसंडी मारताना भाजपकडून दोन जागा जिंकल्या, तर बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या पक्षाने दोन्ही जागांवर लालुप्रसाद यांच्या पक्षाला पराभूत केले. मेघालयाच्या तिन्ही जागा एनपीपीच्या पारड्यात गेल्या. आंध्र प्रदेशात वायएसआर काँग्रेसचा उमेदवार जिंकला.
मध्य प्रदेश, राजस्थान व हिमाचल प्रदेश व कर्नाटक या राज्यांत मात्र काँग्रेस व भाजप थेट सामने झाले. त्यापैकी राजस्थानातील दोन, हिमाचल प्रदेशातील तीन व मध्य प्रदेशातील एक अशा सहा जागा काँग्रेसने जिंकल्या वा स्वत:कडे ठेवल्या. कर्नाटकातील एक जागाही काॅंग्रेसने मिळवली. भाजपने मध्य प्रदेशातील तीन व आसामच्या पाचही जागा जिंकल्या. मेघालयच्या तिन्ही जागांवर सत्ताधारी पक्षाने विजय मिळविला.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला झटका
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला मोठाच धक्का बसला मंडी लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवार व माजी मुख्यमंत्री स्व. वीरभद्र सिंह यांच्या पत्नी प्रतिभा सिंह यांनी विजय मिळविला. विधानसभेच्या जागाही काँग्रेसने जिंकल्या. यापैकी भाजपने जुब्बल-काेटखाई जागा गमावली.
राजस्थानमध्ये काँग्रेस
राजस्थानचमध्ये दोन्ही जागा काँग्रेसने सहजच जिंकल्या. त्या दोन्ही जागा याआधीही काँग्रेसकडेच होत्या. त्या मिळवण्यासाठी भाजपने पूर्ण ताकद लावली होती.
मध्य प्रदेशात भाजपचे नुकसान
मध्य प्रदेशमध्ये भाजपने विधानसभेच्या दोन जागा जिंकल्या, तर एक जागा काँग्रेसने मिळवली. खंडवा लोकसभेची जागाही भाजपने राखली आहे. ज्ञानेश्वर पाटील यांनी ८५ हजारांहून अधिक मतांनी दणदणीत विजय मिळविला.
कर्नाटकमध्येही पिछेहाट
कर्नाटकमध्ये भाजपला आपल्याकडील दोनपैकी एका जागेवर विजय मिळवता आला. सिंदगी येथे भाजपचे रमेश भुसानूर यांनी विजय मिळविला, तर हंगलमधून भाजपचा पराभव करून काँग्रैसचे श्रीनिवास माने विजयी झाले. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या जिल्ह्यातील हा मतदारसंघ आहे.
कृषी कायद्याच्या विरोधात कौल
हरयाणाच्या एलनाबादमधून भारतीय लोकदलाचे अभय चौटाला विजयी झाले. कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिबं देण्यासाठी त्यांना आमदाराकीचा राजीनामा दिला होता. पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराला पराभूत करून ते पुन्हा निवडून आले.