सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी गिफ्ट, 17 टक्के मिळणार महागाई भत्ता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2019 10:25 AM2019-10-19T10:25:08+5:302019-10-19T10:26:54+5:30
उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच गिफ्ट दिलं आहे.
लखनऊः उत्तर प्रदेशातल्या योगी आदित्यनाथ सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधीच गिफ्ट दिलं आहे. योगी सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (डीए) 12 टक्क्यांहून वाढवून 17 टक्के केला आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना 1 जुलैपासून वाढलेला महागाई भत्ताही मिळणार आहे. तसेच महागाई भत्ता राज्य कर्मचाऱ्यासह अनुदानित शैक्षणिक आणि तांत्रिक शैक्षणिक संस्था, शहरी स्थानिक संस्थांच्या कर्मचाऱ्यांनाही मिळणार आहे.
या आदेशानुसार महागाई भत्त्याची 1 जुलैपासून 30 सप्टेंबरपर्यंतची वाढीव रक्कम अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. महागाई भत्त्याची वाढीव शिल्लक रक्कम येत्या पगारात कर्मचाऱ्यांना मिळणार आहे. योगी सरकारनं राज्य कर्मचाऱ्यांना दीपावलीच्या पूर्वीच वाढीव महागाई भत्त्याचा लाभ देण्याचे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी अप्पर मुख्य सचिव संजीव मित्तल यांनी आदेश दिले आहेत. राज्य कर्मचाऱ्यांना 30 दिवसांचा बोनस दिला जाणार आहे. तो बोनस जास्तीत जास्त 7 हजार रुपये राहणार आहे, तर कमीत कमी 3 हजार रुपये मिळणार आहे. तसेच बोनसचा 75 टक्के भाग राज्य कर्मचाऱ्याच्या भविष्य निर्वाह निधीच्या खात्यात जमा केला जाणार आहे. तसेच 25 टक्के रक्कम दिली गेली आहे.