१ कोटी १६ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; बोनसही जाहीर  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2023 06:26 AM2023-10-19T06:26:03+5:302023-10-19T06:26:59+5:30

रबी पिकांच्या हमी भावातही वाढ केल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Diwali of 1 crore 16 lakh central employees before Dussehra! 4 percent increase in inflation allowance, DA Hike; Bonus also announced | १ कोटी १६ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; बोनसही जाहीर  

१ कोटी १६ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांची दसऱ्याआधीच दिवाळी! महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ; बोनसही जाहीर  

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ केली. यामुळे महागाई भत्ता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्के होणार आहे. या निर्णयाचा फायदा ४८.६७ लाख कर्मचारी आणि ६७.९५ लाख पेन्शनधारकांना होणार आहे. याचवेळी केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांना बोनसही जाहीर केला आहे. रबी पिकांच्या हमी भावातही वाढ केल्याने शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. या वर्षी मार्च आणि गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये डीए आणि डीआरमध्ये प्रत्येकी चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती.

कधीपासून लागू?
मंत्रिमंडळाच्या या निर्णयाची माहिती देताना माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले की, वाढीव भत्ता १ जुलै २०२३ पासून लागू होईल. महागाई भत्त्यात ही वाढ सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींवर आधारित सूत्रानुसार आहे.

किती पडणार बोजा? 
महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे सरकारी खजिन्यावर वार्षिक १२ हजार ८५७ कोटींचा भार पडणार आहे.  महागाईचा सामना करण्यासाठी वर्षातून दोनदा डीए, डीआर दिला जातो.

रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस
रेल्वेच्या ११ लाख ७ हजार ३४६ अराजपत्रित कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस देण्याचा निर्णयही घेण्यात आला. त्यामुळे १ हजार ९६९ कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे. रेल्वेने विक्रमी १.५० अब्ज टन मालवाहतूक आणि जवळपास ६.५ अब्ज प्रवाशांना त्यांच्या प्रवासाच्या ठिकाणावर पोहोचवले आहे.

शेतकऱ्यांनाही होणार फायदा
सरकारने बुधवारी २०२४-२५ साठी काही रबी पिकांच्या हमी भावात वाढ केली. प्रमुख गहू उत्पादक राज्यांतील विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने हे पाऊल उचलले. २०१४ मध्ये सत्तेत आल्यानंतर केंद्र सरकारने केलेली एमएसपीमधील ही सर्वात मोठी वाढ आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांना बोनस जाहीर
केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी दिवाळीच्या आधीच बिगर-उत्पादकता आधारित नॉन-प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड तदर्थ बोनस जाहीर केला आहे. निमलष्करी दलांसह ग्रुप सी कर्मचारी आणि बिगर-राजपत्रित ग्रुप बी दर्जाच्या अधिकाऱ्यांना हा बोनस मिळणार आहे. 

Web Title: Diwali of 1 crore 16 lakh central employees before Dussehra! 4 percent increase in inflation allowance, DA Hike; Bonus also announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.