72 हजार कोटींची दिवाळीनिमित्त खरेदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 05:12 AM2020-11-16T05:12:34+5:302020-11-16T05:12:47+5:30
Diwali : नागरिकांचा उत्साह : बाजारपेठेतील मरगळ झाली दूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : दिवाळीच्या उत्साहाने कोरोना चिंतेला मागे टाकले असून, बाजारातही मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याची नोंद आहे. दिवाळीच्या दिवसांत ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली असल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने (सीएआयटी) दिली आहे. विशेष म्हणजे चिनी वस्तूंना यंदा बाजारात प्रवेशच देण्यात आला नव्हता.
सीएआयटीने दिलेल्या माहितीनुसार देशभरातील २० शहरांतून झालेल्या खरेदी-विक्रीच्या आकडेवारीतून दिवाळीच्या
दिवसांत ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे नोंदवले गेले आहे.
एरवी दिवाळीच्या निमित्ताने बाजारात चीननिर्मित अनेक वस्तूंची रेलचेल असते; परंतु यंदा चिनी वस्तूंना बाजारात प्रवेश द्यायचा नाही, असे सर्व व्यापाऱ्यांनी ठरवले होते. त्यानुसार केवळ भारतीय बनावटीच्या वस्तूंचीच विक्री देशभरात झाली. या उलाढालीमुळे चीनचे ४० हजार कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे.
देशातील मोठ्या शहरांत झाले सर्वेक्षण
दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठेत किती उलाढाल होते यासाठी सीएआयटीतर्फे दिल्लीसह मुंबई, चेन्नई, कोलकाता, बेंगळुरू, नागपूर, रायपूर, भुवनेश्वर, रांची, भोपाळ, लखनौ, कानपूर, नोएडा, जम्मू, अहमदाबाद, सुरत, कोचीन, जयपूर आणि चंदीगड या शहरांत सर्वेक्षण करण्यात आले. गृहोपयोगी वस्तू, खेळणी, चपला, कपडे, मिठाई, भांडी, इलेक्ट्रॉनिक वस्तू, गृह सजावटीच्या वस्तू, घड्याळे, फर्निचर इत्यादींची विक्री मोठ्या प्रमाणात झाल्याचे या सर्वेक्षणात आढळून आले. ७२ हजार कोटी रुपयांची उलाढाल यातून झाली, असे सीएआयटीने नमूद केले आहे.