डीके शिवकुमार आणि तुम्ही मिळालेले आहात; संसदेत खर्गेंनी आपल्याच उपमुख्यमंत्र्यांवर आरोप केले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2023 03:27 PM2023-12-12T15:27:53+5:302023-12-12T15:28:29+5:30
जम्मू काश्मीरवरील दोन विधेयकांवरील चर्चेवेळी सुशील कुमार मोदींनी खर्गेंना डीके शिवकुमारांचे नाव घेऊन प्रश्न विचारला होता.
संसदेच्या कनिष्ठ सभागृहात आज विचित्र प्रसंग पहायला मिळाला. काँग्रेस अध्यक्ष आणि राज्यसभा खासदार मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचे चाणक्य मानले जाणारे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी के शिवकुमार यांच्यावर टीका केली. भाजपा खासदार सुशील कुमार मोदी यांनी खर्गेंना कर्नाटकातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यातील जात जनगणनेवरून असलेल्या मतभेदांवर छेडले होते.
जम्मू काश्मीरवरील दोन विधेयकांवरील चर्चेवेळी मोदींनी खर्गेंना डीके शिवकुमारांचे नाव घेऊन प्रश्न विचारला होता. तुमचे सरकार जाती सर्वेक्षणाचा अहवाल कधी जाहीर करणार असा सवाल मोदी यांनी विचारला होता. उपमुख्यमंत्र्यांनी तर रिपोर्ट पब्लिक न करण्यावर एक याचिका सही करून ठेवली आहे, असे विचारले होते. यावर खर्गे यांनी म्हटले की शिवकुमार आणि भाजपा दोन्ही जाती जनगणनेच्या रिपोर्टविरोधात आहेत. दोन्ही विरोध करत आहात. दोघेही या प्रश्नावर एक झाला आहात. हे जातीचे चरित्र आहे. तुम्ही मोठ्या जातीचे लोक मिळालेले आहात, असा आरोप केला.
सिद्धरामय्या यांना जातीवर आधारित जनगणना अहवाल जारी करायचा आहे. 'केवळ अंदाजाच्या आधारे विरोध करू नका. विरोध करणाऱ्यांना याची माहिती नाही., असे मुख्यमंत्री म्हणाले होते. तर डीके यांनी विविध समुदायांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या मागणीचा विचार करण्यात यावा असे सांगत जात जनगणना अहवाल स्वीकारण्यात येऊ नये अशा निवेदनावर स्वाक्षरीही केली होती.
कर्नाटकातही आरक्षणावरून वातावरण तापू लागले असून वोक्कालिगा आणि लिंगायत समुदायांनी जात अहवालाला उघड विरोध केला आहे. हा अहवाल फेटाळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू झाले आहे.