एकीकडे सनातनवर टीका, दुसरीकडे DMK नेत्या कनिमोळींच्या कुटुंबानं राम मंदिरासाठी पाठवली ६१३ किलोंची घंटा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 12:26 PM2023-12-29T12:26:30+5:302023-12-29T12:36:46+5:30
Ram Mandir: गेल्या काही काळात डीएमकेच्या नेत्यांकडून सनातन धर्मावर सातत्याने टीका करण्यात येत होती. मात्र याच डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांच्या कुटुंबीयांकडून राम मंदिरासाठी तब्बल ६१३ किलो वजनाची घंटा भेट देण्यात आली आहे.
अयोध्येत नव्याने उभारण्यात येत असलेल्या राम मंदिरामध्ये २२ जानेवारी रोजी प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्याकडे संपूर्ण देशवासियांचं लक्ष लागलेलं आहे. एकीकडे सत्ताधारी भाजपाकडून या सोहळ्यातील सहभागासाठी जोरदार तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे या कार्यक्रमाला उपस्थित राहायचं की नाही यावरून विरोधी पक्षांमध्ये मतमतांतर दिसत आहे. त्यातच आता तामिळनाडूमधील सत्ताधारी पक्ष असलेल्या डीएमकेमधून राम मंदिरासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही काळात डीएमकेच्या नेत्यांकडून सनातन धर्मावर सातत्याने टीका करण्यात येत होती. मात्र याच डीएमकेच्या नेत्या कनिमोळी यांच्या कुटुंबीयांकडून राम मंदिरासाठी तब्बल ६१३ किलो वजनाची घंटा भेट देण्यात आली आहे. अष्टधातूपासून बनवलेल्या या घंटेवर इंग्रजीमध्ये जय श्रीराम असं लिहिलेलं आहे.
तामिळनाडूमधील रामेश्वरम येथून निघून ही ६१३ किलो वजनाची एक घंटा अयोध्येत दाखल झाली आहे. ही घंटा अष्टधातूंचा वापर करून तयार करण्यात आली आहे. ही घंटा तामिळनाडूच्या खासदार कनिमोळी यांच्या कुटुंबीयांनी पाठवली आहे. त्यावर त्यांचं नावही लिहिलेलं आहे. तसेच या घंटेचं खास वैशिष्ट्य म्हणजे ही घंटा जेव्हा वाजेल तेव्हा त्यामधून ओम असा ध्वनी ऐकू येईल.
भगवान श्रीरामांनी लंकेवर स्वारी करण्यापूर्वी रामेश्वरम येथे शिवलिंगाची स्थापना केली होती. त्यामुळे रामलला यांच्या मंदिरात बांधण्यात येणाऱ्या या घंटेमधून येणाऱ्या ओम ध्वनी शिवशंकराच्या उपस्थितीची जाणीव करून देणार आहे.
डीएमकेच्या खासदार कनिमोळी ह्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या सावत्र भगिनी आहेत. कनिमोळी यांचे पती हे सिंगापूरचे नागरिक आहेत. तसेच कनिमोळी ह्या डीएमकेमध्ये प्रमुख जबाबदाऱ्या सांभाळतात.