२०२४ च्या राष्ट्रीय राजकारणासाठी DMK चा 'मेगा प्लॅन'; शरद पवारांच्या स्वप्नांना ब्रेक लागणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2022 03:43 PM2022-04-04T15:43:37+5:302022-04-04T15:44:07+5:30
हिंदुत्वाच्या विरोधात सामाजिक न्यायाचा नारा बुलंद करून देशात भाजपाचा पर्याय बनू शकतो, असं स्टॅलिन यांना वाटते.
नवी दिल्ली - तामिळनाडूचा प्रादेशिक पक्ष द्रविड मुनेत्र कझागम (DMK) आणि राज्याचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आता राष्ट्रीय राजकारणात उतरण्याच्या तयारीत आहेत. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीतील पक्षाच्या भव्य कार्यालयाच्या नियोजित उद्घाटन कार्यक्रमातूनही याचे संकेत मिळत आहेत. २ एप्रिल रोजी झालेल्या उद्घाटन सोहळ्यासाठी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि इतर पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करण्यात आले होते. विविध पक्षांच्या राष्ट्रीय नेतृत्वाशी संबंध निर्माण करण्याचा एक मार्ग म्हणून या संपूर्ण कार्यक्रमाकडे पाहिले जात होते.
स्टॅलिन यांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा कोणापासून लपून राहिल्या नाहीत. तामिळनाडूचे मुख्यमंत्री २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील NDA विरुद्ध प्रादेशिक आघाडीचे नेतृत्व करण्याची योजना आखत आहेत. त्याला त्यांनी 'सामाजिक न्याय मोर्चा' असं नाव दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली किमान उत्तर भारतात हिंदुत्वाच्या विचारसरणीतून कमंडलचे राजकारण पुढे नेले जात असताना अशा स्थितीत सामाजिक न्याय आघाडीच्या निमित्ताने मंडल राजकारण वाढवणे फायदेशीर ठरेल का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. १९९० च्या दशकात मंडल-कमंडल राजकारणाने संपूर्ण देश प्रभावित झाला होता.
मायावतींच्या अपयशामुळे स्टॅलिन यांना आशा
द्रमुक आणि स्टॅलिन मंडलाच्या राजकारणातील मोठा चेहरा मायावती यांच्या राजकीय सेटबॅकमुळे मोठी संधी असल्याचे राजकीय विश्लेषकांना वाटते. हिंदुत्वाच्या विरोधात सामाजिक न्यायाचा नारा बुलंद करून देशात भाजपाचा पर्याय बनू शकतो, असं स्टॅलिन यांना वाटते. दक्षिणेत सामाजिक न्यायाचे राजकारण झपाट्याने करणाऱ्या स्टॅलिनला उत्तर भारतात तेवढाच पाठिंबा मिळेल का हा वेगळा प्रश्न आहे. यूपी-बिहारसारख्या राज्यात सामाजिक न्यायाचे राजकारण पुन्हा आक्रमक होणार का, हा प्रश्न आहे. DMK ची काँग्रेससोबत युती आहे, तर काही नेते काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी तयार करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे स्टॅलिन यांच्यासमोरही मोठे आव्हान आहे.
द्रमुक दोन्ही राष्ट्रीय आघाडीचा भाग राहिली
डीएमके संसदीय पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री टीआर बालू यांच्यासह द्रमुकचे प्रमुख नेते स्टॅलिनच्या महत्त्वाकांक्षा रोखण्याचा प्रयत्न करत आहेत. स्टॅलिन यांचे वडील आणि तामिळनाडूचे दिवंगत मुख्यमंत्री के करुणानिधी यांनी एनडीए आणि यूपीए या दोन्ही पक्षांशी युती केली होती. दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या काळात द्रमुकचा एनडीएमध्ये आणि सरकारमध्येही सहभाग होता. आता हा पक्ष काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीचा (यूपीए) भाग आहे. इतर अनेक नेते राष्ट्रीय भूमिकेसाठी आकांक्षा बाळगतात त्याप्रमाणे स्टॅलिन यांना पर्यायी प्रादेशिक पक्षाचा नेता म्हणून पुढे करण्यात DMK कसे यशस्वी होते हे पाहणे बाकी आहे.
DMK लोकसभेतीलतिसरा सर्वात मोठा पक्ष
DMK लोकसभेत २३ खासदारांसह तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालच्या तृणमूल काँग्रेस (TMC) आणि आंध्र प्रदेशच्या YSRCP ने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या होत्या आणि ते DMK च्या मागे होते. अशाप्रकारे, देशातील दोन सर्वात मोठे पक्ष, भाजप (३०३ जागा) आणि काँग्रेस (५२ जागा) नंतर सर्वाधिक जागा जिंकण्याचा मान द्रमुककडे आहे.
शरद पवारांना आव्हान?
देशात नरेंद्र मोदी यांच्यासमोर पर्याय निर्माण करायचा असेल शरद पवारांचीच गरज आहे. देशात विरोधकांच्या एकजुटीसाठी शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची असं विधान सातत्याने शिवसेना खासदार संजय राऊत करत असतात. अलीकडेच पवारांनी यूपीएचं नेतृत्व करावं अशीही मागणी जोर धरू लागली. मात्र पवारांनी मला त्यात रस नसल्याचं स्पष्ट केले. मात्र स्टॅलिन यांच्या महत्त्वाकांक्षेने शरद पवारांसमोरही आव्हान उभं राहू शकतं असंही मानलं जात आहे.