कंपन्या आल्यासोबत जमीनही नेतात का?; शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोदींचा विरोधकांवर निशाणा

By कुणाल गवाणकर | Published: December 25, 2020 01:49 PM2020-12-25T13:49:04+5:302020-12-25T13:52:56+5:30

पंतप्रधान मोदींचा व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी संवाद

Do companies take land with them ?; Modi targets opponents while interacting with farmers | कंपन्या आल्यासोबत जमीनही नेतात का?; शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोदींचा विरोधकांवर निशाणा

कंपन्या आल्यासोबत जमीनही नेतात का?; शेतकऱ्यांशी संवाद साधताना मोदींचा विरोधकांवर निशाणा

Next

नवी दिल्ली: नव्या कृषी कायद्यांविरोधात पंजाब, हरयाणातले शेतकरी रस्त्यावर उतरले असताना, दिल्लीच्या सीमेवर महिनाभरापासून आंदोलन सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या शेतकऱ्यांसोबत संवाद साधत आहेत. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांशी बातचीत करताना पंतप्रधानांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. स्वत:च्या राजकीय लाभासाठी विरोधक शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप मोदींनी केला.

प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी ९ कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात १८ हजार कोटी रुपये जमा केले. यानंतर मोदींनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यावेळी मध्य प्रदेशातल्या धार जिल्ह्यातल्या मनोज नावाच्या शेतकऱ्यानं नव्या कृषी कायद्यांमुळे फायदा झाल्याचं सांगितलं. नव्या कायद्यांमुळे नवे पर्याय उपलब्ध झाले. आधी आमच्याकडे बाजारात जाऊन शेतमाल विकण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र आता आम्ही खासगी व्यापारी किंवा संस्थांना शेतमाल विकू शकतो. ते आमच्यासाठी फायदेशीर ठरतं, असं मनोज यांनी मोदींना सांगितलं.




मनोज यांनी त्यांचा अनुभव सांगितल्यानंतर पंतप्रधान मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं. 'काही जण त्यांची राजकीय विचारधारा शेतकऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न करत आहेत. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होईल असा अपप्रचार त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र आता शेतकरीच त्यांना फायदा होत असल्याचं सांगत आहेत,' अशा शब्दांत मोदींनी विरोधकांवर निशाणा साधला.




अरुणाचल प्रदेशमध्ये सेंद्रीय शेती करणाऱ्या गगन पेरिंग यांच्याशीदेखील मोदींनी संवाद साधला. 'मला प्रधानमंत्री किसान सम्मान निधीच्या अंतर्गत ६ हजार रुपये मिळाले. त्याचा वापर मी सेंद्रीय खतं आणि औषधं खरेदी करण्यासाठी केला. एफपीओच्या माध्यमातून माझ्यासोबत ४४६ शेतकरी जोडले गेले आहेत. तेदेखील सेंद्रीय आल्याचं उत्पादन घेतात,' असं पेरिंग यांनी सांगितलं.

छोटे शेतकरी खासगी कंपन्यांसोबत जोडले गेल्यावर त्या कंपन्या तुमच्याकडून केवळ उत्पादनं घेतात की तुमची जमीनदेखील घेतात, असा सवाल मोदींनी पेरिंग यांना विचारला. त्यावर पेरिंग यांनी नुकताच आम्ही एका कंपनीसोबत करार केला. हा करार केवळ उत्पादन खरेदी करण्यासाठी आला आहे. आमच्या जमिनीसाठी नाही. आमची जमीन सुरक्षित आहे, असं उत्तर दिलं. त्यावर तुमची जमीन सुरक्षित असल्याचं तुम्ही म्हणता. पण इथे कंपन्या शेतकऱ्यांची जमीन घेतील, अशा अफवा पसरवल्या जात आहेत, असं म्हणत मोदींनी विरोधकांना लक्ष्य केलं.

Web Title: Do companies take land with them ?; Modi targets opponents while interacting with farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.