आता घरात बसूनच करा देशभरातील Bus Booking, IRCTCने सुरू केली खास सुविधा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 11:30 AM2021-10-13T11:30:19+5:302021-10-13T11:37:28+5:30
Bus Booking : IRCTCने देशभरातील Bus Booking करण्याची सेवा सुरू केली आहे. आता पर्यटक घरात बसून देशभरातील कुठल्याही बसचे तिकीट बुक करू शकणार आहेत.
नवी दिल्ली : आयआरसीटीसीने देशभरातील बसचे बुकिंग करण्याची सेवा सुरू केली आहे. आता पर्यटक घरात बसून देशभरातील कुठल्याही बसचे तिकीट बुक करू शकणार आहेत.
आयआरसीटीसीचे टुरिझम पोर्टल www.bus.irctc.co.in किंवा आयआरसीटीसीचे रेल कनेक्ट ॲप यांवरून बसच्या तिकिटाचे बुकिंग करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. वास्तविक ही सेवा जानेवारी २०२१ मध्येच सुरू करण्यात आली होती. तथापि, कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेमुळे त्यावर पुढे काम होऊ शकले नव्हते. आता कोरोनाची लाट ओसरल्यामुळे या प्लॅटफॉर्मवरून बसच्या बुकिंगला गती मिळण्याची शक्यता आहे. सध्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ५० हजारांहून अधिक बस गाड्या बुकिंगसाठी उपलब्ध असतील. यात शासकीय आणि खाजगी अशा दोन्ही बसचा समावेश आहे. या सुविधेवरून २२ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये सेवा पुरवली जाणार आहे. आयआरसीटीसीच्या ऑनलाइन बस तिकीट बुकिंगवर बँका आणि ई-वॉलेटद्वारे सूट देखील उपलब्ध असेल.
असे होईल बस तिकीट बुक
- बस तिकीट बुकिंगसाठी www.bus.irctc.co.in ला भेट द्या. तुम्हाला कुठून कुठे प्रवास करायचा आहे, ती दोन्ही ठिकाणे निर्धारित जागेमध्ये भरा.
- प्रवासाची तारीख निवडा आणि सर्च वर क्लिक करा. तुम्हाला त्या मार्गावर उपलब्ध बसचे पर्याय, प्रवासाचा कालावधी, गंतव्य स्थानी पोहोचण्याची वेळ इत्यादी माहिती दिसेल. तिकिटाची किंमत आणि किती जागा बुक करायच्या बाकी आहेत, याचा तपशीलही दिसेल.
- प्रवासी सीटर, स्लीपर, एसी आणि नॉन-एसी
बस निवडू शकतात. सीट निवड आणि बोर्डिंग/ड्रॉपिंग पॉईंट्स देखील निवडले जाऊ शकतात.
- सीट निवडल्यानंतर ‘प्रोसिड टू बुक’वर क्लिक करा. येथे तुम्हाला लॉगिन करावे लागेल. तिकिटाची किंमत भरल्यानंतर बसचे तिकीट ऑनलाइन बुक होईल.