घाबरणार नाही, झुकणारही नाही!
By Admin | Published: December 20, 2015 01:37 AM2015-12-20T01:37:57+5:302015-12-20T01:37:57+5:30
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधींसह चार ओरोपी हजर झाल्यावर महानगर दंडाधिकारी लवलीन यांनी सर्वांना लगेच शनिवारी जामीन मंजूर केला. काँग्रेस पक्षाने
- सुरेश भटेवरा, नवी दिल्ली
‘नॅशनल हेराल्ड’ प्रकरणात सोनिया गांधी व राहुल गांधींसह चार ओरोपी हजर झाल्यावर महानगर दंडाधिकारी लवलीन यांनी सर्वांना लगेच शनिवारी जामीन मंजूर केला. काँग्रेस पक्षाने आपल्या नेत्यांच्या कोर्टातील ‘पेशी’च्या वेळी बाहेर मोठे शक्तिप्रदर्शन केले. सरकारने सर्व यंत्रणांचा आमच्याविरुद्ध वापर केला तरी आम्ही जराही झुकणार नाही. इंचभरही मागे हटणार नाही. देश काँग्रेसमुक्त करण्याचे भाजपाचे स्वप्न कधीही साकार होणार नाही, असे सोनिया व राहुल गांधी यांनी न्यायालयातून परतल्यानंतर जाहीर केले.
सोनिया गांधी म्हणाल्या, ‘हम डरनेवाले नही है। इनके खिलाफ हमारा संघर्ष जारी रहेगा। राजनीतिक विरोधीयोंसे हम वाकिफ है। यह सिलसिला पीढियोंसे चला आ रहा है। यह और बात है की ये लोग हमें कभी भी अपने रास्तेसे हटा नही पाये। मैं आज अदालत में साफ मनसे पेश हुई। जैसा की कानून का पालन करनेवाले किसी भी शख्स को करना चाहिए। देशका कानून बिना किसी भय और पक्षपातसे सभी पर लागू होता है। केंद्र सरकार अपने विरोधीयों को जान बुझकर निशाना बना रही है, इसके लिए सरकारी एजन्सीयोंका पुरा इस्तेमाल कर रही है। मुझे जरा भी संदेह नही है, की सच्चाई सामने आयेगी।’
पटियाला हाऊ स न्यायालयातून काँग्रेस मुख्यालयात परतलेल्या सोनिया गांधी पत्रकारांना उद्देशून अत्यंत संयत मात्र निग्रही स्वरात बोलत होत्या. त्यांच्या प्रत्येक शब्दात जबरदस्त आत्मविश्वास जाणवत होता. २४ अकबर रोड येथील काँग्रेस मुख्यालयाच्या आवारात काँग्रेस कार्यक र्त्यांची प्रचंड गर्दी उसळली होती.‘सोनिया- राहुल जिंदाबाद’, ‘हम नही डरेंगे.. आखरी दमतक लडेंगे’ अशा घोषणांच्या माहोलमधे चहुकडे तिरंगी झेंडे फडकत होते.
सोनियांच्या छोट्याशा निवेदनानंतर पंतप्रधान मोदींचा थेट नामोल्लेख करीत राहुल गांधी पत्रकारांना म्हणाले, मी कायद्याचा आदर करतो. आमच्यावर खोटेनाटे आरोप करतांना मोदींना वाटते की विरोधक आपल्यापुढे झुकतील, देशातल्या तमाम नागरीकांना मी सांगू इच्छितो की आम्ही झुकलो नाही आणि झुकणार नाही. विरोधकाच्या भूमिकेतून गरीबांसाठी लढत राहू. एक इंचही मागे हटणार नाही. मोदींना काँग्रेसमुक्त भारत हवा आहे. तो कधीही होणार नाही.
गुलाम नबींचा मोदींवर हल्ला
सोनिया व राहुल गांधी न्यायालयाच्या दिशेने कूच करण्याआधी मुख्यालयात जमलेल्या काँग्रेस कार्यक र्त्यांपुढे बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले, ‘सुरुवातीपासूनच आम्हाला संशय होता की नॅशनल हेराल्ड प्रकरणात सुब्रमण्यम स्वामी ज्या पद्धतीने कारस्थाने करीत आहेत, त्यामागे पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारचा हात असावा. स्वामी संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नाहीत. ना दहशतवादाविरुद्ध त्यांनी कोणताही संघर्ष केला आहे.
तरीही केंद्र सरकारने सारे नियम धाब्यावर बसवून त्यांना झेड श्रेणीची सुरक्षा व फक्त कॅबिनेट मंत्र्यालाच अॅलॉट होऊ शकणारे निवासस्थान दिले आहे, स्वामींना सोनिया व राहुल यांच्या विरोधात कारस्थाने करण्यासाठी केंद्राकडून मिळालेला हा पुरस्कारच आहे. ही बाब आता स्पष्ट झाली आहे.
केंद्रात सत्तेवर आल्यापासून भाजपा विरोधकांना टार्गेट बनवीत आहे. पूर्वी कधी असे घडले नव्हते. अरुणाचल प्रदेशात लोकनियुक्त सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले, त्यात त्यांना यश मिळाले नाही. न्यायालयाच्या निकालामुळे ते तोंडावर आपटले. विरोधकमुक्त भारत हे भाजपाचे लक्ष्य बनले आहे. आम्ही ते कदापि यशस्वी होऊ देणार नाही. कायदेशीर मार्गाने असो की संघर्षाच्या मार्गाने, संसद ते सडक ही लढाई जिद्दीने लढली जाईल.’
अँटनी, प्रियंका राहिले जामीन
सोनिया व राहुल गांधी तसेच मोतीलाल व्होरा, आॅस्कर फर्नांडिस व सुमन दुबेंना पटियाला हाउस न्यायालयात प्रत्येकी ५0 हजारांच्या मुचलक्यावर बिनशर्त जामीन मिळाला. आजारी असल्याने सॅम पिट्रोडा कोर्टात हजर नव्हते. न्यायालयीन कारवाई अवघी १५ मिनिटे चालली. सोनिया गांधींचा जामीन ए.के. अँटनींनी तर राहुलचा जामीन प्रियंका गांधींनी दिला.
निदर्शनांतून देशभर संताप
काँग्रेस मुख्यालयात काँग्रेसजनांचा संताप ठायीठायी जाणवत होता. काँग्रेस कार्यकर्त्यांची देशभर ठिकठिकाणी निदर्शने सुरू असल्याच्या बातम्याही इथे कानावर येत होत्या.
बाहेरगावच्या तमाम कार्यक र्त्यांना दिल्लीत येऊ नका अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या असल्या तरी हरयाणा, उत्तराखंड, रायबरेली व अन्य भागांतून शेकडो काँग्रेस कार्यकर्ते मुख्यालयात दाखल झाले होते.