'भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे'; मुकेश अंबानींना डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे आश्वासन
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2020 08:45 AM2020-02-26T08:45:29+5:302020-02-26T09:04:33+5:30
ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या विरोधकांवर टीका केली. अमेरिकेतील विरोधकांनी स्टील इंडस्ट्री बंद करून टाकली आहे. ही चांगली बाब नाही. मी आल्यानंतर अॅल्युमिनिअम व्यापारामध्ये चांगली वाढ झाली आहे.
नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गेले दोन दिवस भारत दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी देशातील टॉपच्या 20 कंपन्यांच्या सीईओ, चेअरमन यांच्याशी चर्चा केली. यावेळी ट्रम्प यांनी उद्योजकांना वेगवेगळे प्रश्न विचारले. यावेळी रिलायन्सचे मुकेश अंबानी यांनी रिलायन्स इंडस्ट्रीचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अमेरिकेच्या उर्जाक्षेत्रामध्ये गुंतवणूक केल्याची माहिती दिली. तसेच महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अमेरिकेमध्ये 1 अब्ज डॉलरची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले. यावर ट्रम्प खूश झाले.
यानंतर ट्रम्प यांनी तुम्ही ५ जी साठी काही पाऊले उचलत आहात की नाही असा प्रश्न केला. यावर मुकेश अंबानी यांनी हो असे उत्तर देत रिलायन्स ग्रुप 5 जीमध्ये चांगले काम करत आहे. ही एकमेव अशी कंपनी आहे जी चीनच्या मदतीशिवाय देशात 5 जी लाँच करणार आहे. तसेच गेल्या काही वर्षांपासून अमेरिकेशी व्यापारामध्ये मोठी सूट मिळत असल्याचे म्हटले. यावर ट्रम्प यांनी जोपर्यंत मी आहे तो पर्यंत मिळत राहतील असे आश्वासन दिले.
ट्रम्प यांनी यावेळी त्यांच्या विरोधकांवर टीका केली. अमेरिकेतील विरोधकांनी स्टील इंडस्ट्री बंद करून टाकली आहे. ही चांगली बाब नाही. मी आल्यानंतर अॅल्युमिनिअम व्यापारामध्ये चांगली वाढ झाली आहे. संरक्षण क्षेत्रामध्ये स्टील आणि अॅल्युमिनिअमची मोठी गरज असते. तुम्ही यामध्ये चांगले काम करत आहात, असे आर्सेलर मित्तलचे अध्य़क्ष लक्ष्मी मित्तल यांना ट्रम्प यांनी सांगितले.
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी अमेरिकेत केलेल्या गुंतवणूकीबद्दल सांगितले. ते म्हणाले की त्यांची कंपनी अमेरिकेत पोस्टल सर्व्हिस डिलिव्हरी व्हॅन उत्पादनासाठी काम करत आहे. आतापर्यंत दहा लाखाहून अधिक व्हॅन बांधल्या गेल्या आहेत. लवकरच त्यात आणखी अब्ज डॉलर्सची गुंतवणूक होईल. यावर ट्रम्प यांनी महिंद्रांचे अभिनंदन व आभार मानले.
करकपात केल्यास फायदा
टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन म्हणाले की अमेरिकेत गुंतवणुकीची बरीच शक्यता आहे. जर कर कमी केला तर उद्योग स्थापन करणे खूप सोपे होईल. आमची कंपनी अमेरिकन तरुणांना प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. आम्ही यापुढेही सुरू ठेवू. यावर ट्रम्प म्हणाले, 'तुमची कंपनी अमेरिकेतील 15 दशलक्ष तरुणांना प्रशिक्षण देत आहे. हे मोठे काम आहे. मला असे वाटत नाही की कोणतेही सरकार या प्रकारची कामे करू शकते. सरकारकडे मर्यादित स्त्रोत आहेत. अशा प्रशिक्षण कामांवर आपण कितीही पैसा खर्च केला तरी काही फायदा होत नाही. या कामाबद्दल धन्यवाद. '