बेळगावात येऊ नका! कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा महाराष्ट्रातील मंत्र्यांना इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2022 06:48 PM2022-12-02T18:48:16+5:302022-12-02T18:48:40+5:30
सोलापूरात कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याचं कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
बेळगाव - महाराष्ट्रकर्नाटक सीमावाद दिवसेंदिवस चिघळत असून कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांच्याकडून वारंवार वादग्रस्त विधाने येत आहेत. सीमाप्रश्नी नेमलेले महाराष्ट्राचे मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभुराज देसाई हे बेळगाव दौरा करणार होते. परंतु या दौऱ्यावर लक्ष करत महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी कर्नाटकात येऊ नये असा इशारा बोम्मई यांनी दिला आहे. त्यामुळे कर्नाटकाची महाराष्ट्रावर कुरघोडी सुरूच आहे.
बेळगावात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई बोलत होते. ते म्हणाले की, सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्रातील सीमाप्रश्न परिस्थिती पाहता महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये. याबाबत कर्नाटकच्या मुख्य सचिवांनी महाराष्ट्राच्या मुख्य सचिवांना ही माहिती दिल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सीमेपलीकडील जनता आपलीच आहे. तेथील कन्नड शाळांना निधी दिला जात नाही. मुलभूत सुविधाही मिळत नाहीत. कन्नड रक्षण प्राधिकरणाच्या माध्यमातून या शाळांना निधी दिला जाईल. सोलापूरात कन्नड भवन बांधण्यासाठी १० कोटी रुपये मंजूर केल्याचं म्हटलं आहे.
शिवसेनेचा शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा
महाराष्ट्राचं सरकार अशाप्रकारे फतवा काढणार का की कर्नाटकच्या मंत्र्यांनी इथे येऊ नये. कर्नाटकचे मंत्री महाराष्ट्रात येतात आम्ही कधी त्यांना अडवत नाही. महाराष्ट्रात मुंबईत अनेक कानडी बंधू राहतात. बेळगाव, कारवारसह सीमाभागात मराठी माणसांवर अन्याय होतात. तिथे आपले सरकार २ मंत्री पाठवतायेत. पण महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनाही पाय ठेऊ देणार नाही असं शिवसेना खासदार संजय राऊतांनी सांगितले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री आपल्या सरकारवर थुंकताय हे परत सिद्ध झाले. तुम्ही जी क्रांती केलीय त्याचं काय? मंत्र्यांना पाय ठेवू दिला जात नाही असं देशात होत नाही. मतभेद असू शकतात. यायचं नाही ही मुजोरी मस्ती याआधीच्या कुठल्याही सरकारच्या काळात झालं नाही. राज्यात जे स्वयंभू क्रांतीचं सरकार आलंय त्यांना महाराष्ट्र अद्याप कळालेला नाही. मुख्यमंत्री केवळ ४० आमदारांचे आहेत असं वाटतं. हा महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावात येण्यापासून रोखलं. हे घटनेला, संविधानाला दिलेले आव्हान आहे. या देशातील नागरीक कुठेही जाऊ शकतो. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर द्यावे. निदान उपमुख्यमंत्र्यांनी तरी बोलावं. सरकारला जमत नसेल तर आम्ही बेळगावला जाण्याचा विचार करू असा इशारा संजय राऊतांनी दिला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"