बाळाला मांडीवर घेऊन स्वयंपाक करू नका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2024 11:39 AM2024-07-10T11:39:22+5:302024-07-10T11:39:34+5:30

धुराच्या संपर्कात आल्याने १,००० मुलांपैकी २७ बाळांचा होतोय मृत्यू

Do not cook with a baby on your lap Babies are dying due to exposure to smoke | बाळाला मांडीवर घेऊन स्वयंपाक करू नका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

बाळाला मांडीवर घेऊन स्वयंपाक करू नका; अहवालातून धक्कादायक माहिती समोर

वॉशिंग्टन :केंद्र सरकार स्वयंपाकासाठी वापरण्यात येत असलेली चूल बंद करून त्याजागी गॅस देण्याचा प्रयत्न करीत असतानाही यात अद्याप अपेक्षित यश हाती आलेले दिसत नाही. त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात स्वयंपाकासाठी लाकूड, शेणखत या इंधनाचा वापर होत आहे. धुराच्या संपर्कात आल्याने देशात १,००० मुलांपैकी २७ मुलांचा मृत्यू होत असल्याचे धक्कादायक वास्तव अमेरिकेतील एका प्रतिष्ठित विद्यापीठाने जारी केलेल्या अहवालातून समोर आले आहे.

कॉर्नेल विद्यापीठातील चार्ल्स एच. डायसन स्कूल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक्स अॅण्ड मॅनेजमेंटचे प्राध्यापक अर्णब बसू यांनी 'भारतातील स्वयंपाकासाठीच्या इंधन निवडी आणि बालमृत्यू' या शीर्षकाच्या अहवालात १९९२ ते २०१६ दरम्यान करण्यात आलेल्या अनेक सर्वेक्षण डेटाचा वापर केला आहे. या प्रदूषणकारी इंधनांचा मानवी आरोग्यावर काय परिणाम होतो हे शोधण्यासाठी या डेटाचा वापर केला. एका महिन्यापर्यंतच्या बालकांवर याचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे अभ्यासात आढळून आले. यात बदल होणे लगेच शक्य नाही. सध्या बहुतेक लक्ष बाहेरील वायुप्रदूषण आणि पिकाचा कचरा जाळण्यावर केंद्रित आहे. सरकारने घरातील प्रदूषणाकडे लक्ष देणे तितकेच महत्त्वाचे आहे, असे अहवालात म्हटले आहे.

आईवर असते स्वयंपाकाची जबाबदारी

लहान मुलांची फुप्फुसे पूर्णपणे विकसित झालेली नसतात, ही मुले त्यांचा बहुतेक वेळ त्यांच्या आईच्या मांडीवर घालवतात. मात्र, या मुलांच्या आईवर घरातील सर्वांचा स्वयंपाक करण्याची सर्व जबाबदारी असते.

त्यामुळे मुलांच्या श्वासावाटे धूर शरीरात जातो. या धुरामुळे १ हजार लहान मुलांपैकी २७ बालकांचा मृत्यू होत असल्याचे बसू यांनी म्हटले आहे.
३२ लाख लोकांचा धुरामुळे मृत्यू होतो

उपचारातही मुलगाच महत्त्वाचा

स्वयंपाकासाठी धूर निर्माण करणारे इंधन वापरल्याने भारतामध्ये मृत्यू होण्यामध्ये मुलांपेक्षा मुलींचा अधिक समावेश आहे.

मुली अधिक नाजूक असतात किवा प्रदूषणाशी संबंधित श्वसनाच्या आजारांना बळी पडतात हे त्याचे कारण नसून, भारतात मुलांना जास्त प्राधान्य दिले जाते आणि मुलगी आजारी पडते किंवा खोकला होतो, तेव्हा कुटुंबीय त्याकडे दुर्लक्ष करतात. 

जगातील सुमारे एक तृतीयांश लोक चुलीवर किंवा स्टोव्हवर जेवण बनवतात. यात लाकूड, शेणखत, काडीकचरा यांचाही वापर करण्यात येतो, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. स्वच्छ इंधनाचा वापर केल्याने मुलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम होईलच; शिवाय मुलींकडे होणारे दुर्लक्षही कमी होईल - अर्णब बसू, प्राध्यापक 
 

Web Title: Do not cook with a baby on your lap Babies are dying due to exposure to smoke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.