सभागृहात पंतप्रधानांविरोधात घोषणा देऊ नका - सोनिया गांधींची सूचना
By admin | Published: December 24, 2015 09:55 AM2015-12-24T09:55:36+5:302015-12-24T10:52:49+5:30
संसदेत सरकारविरुद्ध आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याविरोधात घोषणा देऊ नका, असे निर्देश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खासदारांना दिले.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २४ - संसदेत सरकारविरुद्ध आंदोलन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्याविरोधात घोषणा देऊ नका, असे निर्देश काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी खासदारांना दिले. इतके दिवस काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधीनी मोदींवर टीका केलेलीअसताना व सरकारविरोधातील आंदोलनाचे नेतृत्व खुद्द सोनिया गांधी यांनीच केलेले असताना, त्यांनी आता अचानक केलेल्या या सूचनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
हिवाळी अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी बुधवारी प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे लोकसभेत आगमन झाले. त्यावेळी काँग्रेस नेते लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्या आसनासमोर डीडीसीएच्या मुद्यावरून केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्याविरुद्ध घोषणा देत होते. त्यात बंगालचे खासदार अधिर रंजन चौधरी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याविरोधात घोषणा दिली असता सोनिया गांधी यांनी त्यांना इशा-यानेच मोदींविरोधात घोषणा न देण्यास बजावले. त्यानंतर चौधरी यांनी तत्काळ मोदींचे नाव घेणे थांबवले.
त्यामुळे संपूर्ण हिवाळी अधिवेशनात काँग्रेस खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधातील घोषणांमध्ये अखेरच्या दिवशी तरी खंड पडला. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर पंतप्रधान मोदी सभागृहातून निघून गेले.
देशातील सर्वोच्च पदावरील नेत्याचा अपमान केल्याबद्दल टीका होऊ नये म्हणूनच ही सावध भूमिका घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.