तहान लागल्यावरच विहीर खणू नका - सर्वोच्च न्यायालय
By admin | Published: October 6, 2016 05:39 AM2016-10-06T05:39:34+5:302016-10-06T05:39:34+5:30
यंदा पाऊस आणि पिकपाण्याची परिस्थिती गेल्या वर्षाइतकी वाईट नसली तरीही देशाच्या काही भागांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही.
नवी दिल्ली : यंदा पाऊस आणि पिकपाण्याची परिस्थिती गेल्या वर्षाइतकी वाईट नसली तरीही देशाच्या काही भागांमध्ये पुरेसा पाऊस झालेला नाही. तेव्हा गतवर्षाप्रमाणे तहान लागल्यावर विहीर खणण्याची चूक पुन्हा न करता जेथे पाऊस कमी झाला आहे अश भागांतील संभाव्य दुष्काळी परिस्थिती हाताळण्यासाठी वेळीच तयार राहा, असे सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सुनावले.
गेल्या वर्षी १३ राज्यांत पडलेल्या भीषण दुष्काळाच्या संदर्भात ‘स्वराज अभियान’ या संघटनेने केलेली जनहित याचिका अजूनही प्रलंबित आहे. न्या. एम. बी. लोकूर व न्या. एन. व्ही. रमणा यांच्या खंडपीठापुढे यावर बुधवारी पुन्हा सुनावणी झाली तेव्हा यंदाही अनेक जिल्ह्यांमध्ये अपुरा पाऊस झालेला आहे व सरकार याही वेळ गाफील राहिले तर तेथे यंदाही दुष्काळी स्थिती गंभीर रूप धारण करू शकते, असे सांगितले गेले तेव्हा न्यायालयाने वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. सरकारला उद्देशून न्यायाधीश म्हणाले की, आम्हाला तुमच्या दृष्टिकोनाची चिंता वाटते. तुम्ही तुमची मानसिकता बदलायला हवी. वेळीच दुष्काळ जाहीर न करण्याची गेल्या वर्षी ची चूक यंदा पुन्हा करू नका. (लोकमत न्यूज नेटवर्क)
यंदा परिस्थिती गेल्या वर्षीइतकी वाईट नाही, हे खरे, पण गाफील राहू नका, तहान लागल्यावर विहीर खणू नका. वेळीच पावले उचला, एवढेच आम्हाला म्हणायचे आहे.
- न्या. लोकूर व न्या. रमणा,
(सरकारला उद्देशून)