‘डिजिटल इंडिया’ नको, शेतकऱ्यांकडे लक्ष द्या!
By admin | Published: February 22, 2016 01:19 AM2016-02-22T01:19:17+5:302016-02-22T01:19:17+5:30
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यासारख्या अभियानांची धडाक्यात सुरुवात केली असली तरी यापेक्षा सरकारने शेतकरी आणि एकूणच कृषी
- नितीन अग्रवाल, नवी दिल्ली
केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यासारख्या अभियानांची धडाक्यात सुरुवात केली असली तरी यापेक्षा सरकारने शेतकरी आणि एकूणच कृषी क्षेत्राकडे लक्ष द्यावे, असे भारतीयांना वाटत आहे. केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात लोकांनी ही अपेक्षा व्यक्त केली आहे. स्वच्छ भारत, डिजिटल इंडिया आणि स्टार्ट-अप्स यापेक्षा सरकारने कृषी क्षेत्रास प्राधान्य द्यावे, असे लोकांना वाटते आहे.
अर्थ मंत्रालयाच्या सूत्रांनी ही माहिती दिली. या सर्वेक्षणात चार प्रमुख वर्ग, चार क्षेत्र. समाजाचे चार घटक आणि सरकारी योजनांबाबत लोकांचे मत विचारले गेले होते. अर्थसंकल्पात शेतकरी, युवा व महिला, मध्यमवर्गीय व निम्न वर्ग यापैकी कुणाला सर्वोच्च प्राधान्य दिले जायला हवे, असे मंत्रालयाने विचारले होते. सर्वेक्षणात सामील लोकांपैकी सर्वाधिक ५७ टक्के लोकांनी शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त केली. २७ टक्के लोकांनी मध्यमवर्ग, १० टक्के लोकांनी महिला व युवा तसेच ६ टक्के लोकांनी निम्न वर्गास प्राधान्य देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. कृषी उत्पादन व पायाभूत आराखडा, सेवा आणि स्टार्ट-अप्स यातही लोकांनी कृषीला सर्वाधिक प्राधान्य देण्याचे मत व्यक्त केले.
मायक्रो ब्लॉगिंग साईट टिष्ट्वटरवर करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात सुमारे १५,५०० लोकांनी भाग घेतला. शहरी लोकांद्वारे वापरल्या जाणाऱ्या टिष्ट्वटरवर कृषी आणि शेतकरी यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त झाल्याने सरकारलाही धक्का बसला. डिजिटल तंत्राचा वापर करणाऱ्यांंनीच डिजिटल इंडियाबाबत अनास्था दाखवणे, याबाबतही सरकारने आश्चर्य व्यक्त केले.