पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांची गुन्हेगारांना हात जोडून विनवणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 05:25 AM2018-09-26T05:25:17+5:302018-09-26T05:25:35+5:30
बिहारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी किमान पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, अशी विनवणी
- ए. पी. सिन्हा
पाटणा - बिहारमधील गुन्हेगारीला आळा घालण्यात अपयश आल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री व भाजपचे नेते सुशीलकुमार मोदी यांनी किमान पितृपक्षात तरी गुन्हे करू नका, अशी विनवणी राज्यातील गुन्हेगारांना करताना, त्यासाठी मी तुमच्यापुढे हात जोडतो, असे वक्तव्य केल्याने विरोधकांना टीकेसाठी आयतीच संधी मिळाली आहे.
बिहारमधील गया येथे दरवर्षी पितृपक्ष मेळा भरतो. देशभरातील लाखो लोक त्यावेळी तिथे पिंडदानासाठी येतात. त्या मेळ्याच्या उद्घाटनासाठी सुशीलकुमार मोदी तिथे गेले होते. तिथे गुन्हेगारांना उद्देशून उपमुख्यमंत्री म्हणाले की, तुम्ही एरवी गुन्हे करीतच असता. आम्ही गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी प्रयत्न केले तरी तुमचे गुन्हे सुरूच राहतात. आता किमान पितृपक्षामध्ये तरी गुन्हे करू नका, अशी माझी तुम्हाला हात जोडून विनंती
आहे.
गया येथे देशभरातून जे लोक पिंडदानासाठी येतात, त्यांना लुबाडणे, त्यांच्या वस्तू वा पैसा लुटणे, त्यांना धमकावणे असे प्रकार मोठ्या प्रमाणात होतात. बिहारचे नाव देशात आणखी बदनाम करू नका, असे सांगताना ते म्हणाले की, १५ दिवस चालणाऱ्या हिंदूंच्या या धार्मिक कार्यक्रमात तरी तुम्ही कृपाकरून काही करू नका. परराज्यांतून आलेल्या एकाही व्यक्तीकडून गुन्हेगारी, गुंडगिरीची तक्रार येऊ नये, अशी सरकारची इच्छा आहे.
आता पायाही पडा : तेजस्वी यादव
सुशीलकुमार मोदी यांच्या या विनवणीमुळे राष्ट्रीय जनता दल व काँग्रेसने नितीशकुमार सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
बिहारमधील सत्ताधारी आता गुन्हेगारांनाच विनवण्या करू लागले आहेत, आता गुन्हेगारांच्या पाया पडणे तेवढे सरकारने बाकी ठेवले आहे, अशी टीका राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी केली.
गुन्हेगारांकडे याचना करणारे सरकार बिहारच्या जनतेने याआधी कधीही पाहिले नव्हते, असा टोला काँग्रेसनेही लगावला आहे.