‘मानगुटीवर बसून वसूल केलेली देणगी नको’
By admin | Published: October 26, 2016 01:21 AM2016-10-26T01:21:23+5:302016-10-26T01:21:23+5:30
पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणाऱ्या निर्मात्यांनी यांनी सैनिक कल्याण निधीला ५ कोटी देण्याच्या अटीवरून त्यांच्यावर टीका होत असताना, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर
नवी दिल्ली : पाकिस्तानी कलाकारांना चित्रपटात घेणाऱ्या निर्मात्यांनी यांनी सैनिक कल्याण निधीला ५ कोटी देण्याच्या अटीवरून त्यांच्यावर टीका होत असताना, संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनीही ‘एखाद्याच्या मानगुटीवर बसून बळजबरीने वसूल केलेल्या देणगीची भारतीय लष्कराला गरज नाही, मदत स्वच्छेने आली पाहिजे,’ असे म्हणत राज ठाकरे यांना खडे बोल सुनावले.
भारतीय नौदलाच्या कमांडर कॉन्फरनसचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी पत्रकार परिषदेत पर्रिकर म्हणाले की, ‘‘एखाद्याला सैन्यासाठी निधी द्यायचा असेल, तर तो देऊ शकतो. मात्र, मदत ही ऐच्छिक असावी. कोणाच्या मानगुटीवर बसून जबरदस्तीने घेतलेल्या देणगीची सैन्याला गरज नाही. (लोकमत न्यूज नेटवर्क)
मदत ऐच्छिक असावी
मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी निर्माते आणि राज ठाकरे यांच्यात मध्यस्थी केल्यामुळे त्यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले जात होते. मात्र या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या मोबदल्यात सैनिक कल्याण निधीला ५ कोटी देण्याच्या राज यांच्या प्रस्तावाला विरोध होता असा दावा फडणवीस यांनी केला आहे. मदत ऐच्छिक असावी, तडजोडीसाठी नव्हे, असेच माझे मत होते आणि आहे, असेही ते म्हणाले.