काश्मीर वादात चीन-पाकिस्ताननं पडू नये- राहुल गांधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 01:03 PM2017-07-21T13:03:19+5:302017-07-21T13:03:19+5:30
काश्मीर म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच काश्मीर, असं म्हणत राहुल गांधी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या सुरू असलेल्या गुप्त चर्चांवर टीका केलीय
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - काश्मीर म्हणजेच भारत आणि भारत म्हणजेच काश्मीर, असं म्हणत राहुल गांधी यांनी चीन आणि पाकिस्तानच्या सुरू असलेल्या गुप्त चर्चांवर टीका केलीय. काश्मीरच्या वादात कोणत्याही तिस-या पक्षकारानं हस्तक्षेप करण्याची गरज नाही, असंही राहुल गांधींनी चीनला ठणकावून सांगितलंय.
राहुल गांधी यांनी या निमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केलीय. मोदींच्या चुकीच्या धोरणांमुळे काश्मीरमध्ये हिंसाचार वाढला आहे. काश्मीरच्या मुद्द्यावर चीन आणि पाकिस्तानमध्ये अंतर्गत चर्चा सुरू आहे. मात्र माझ्या दृष्टिकोनातून हा भारताचा अंतर्गत विषय आहे. त्यामुळे त्यात त्रयस्थ देशानं पडण्याची गरज नाही, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी काश्मीरमध्ये उफाळून आलेल्या हिंसाचाराला भाजपा आणि एनडीए सरकारला जबाबदार धरलं आहे. नरेंद्र मोदी आणि एनडीएच्या चुकीच्या धोरणांमुळेच काश्मीर धुमसतंय, असं म्हणत राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वीची राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती. त्यावेळी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदींचा दुबळे पंतप्रधान म्हणून उल्लेख केला होता. एच-1बी व्हिसा मुद्दा उपस्थित न केल्याबद्दल आणि अमेरिकेने ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा उल्लेख केला असताना त्याचा विरोध न केल्याबद्दल राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना दुबळे पंतप्रधान संबोधले होते. राहुल गांधी यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे वक्तव्य केलं होते. 26 जून रोजी हिजबुल मुजाहिद्दीनचा म्होरक्या, दहशतवादी सईद सल्लाउद्दीनला ‘आंतरराष्ट्रीय दहशतवादी’ घोषित करताना अमेरिकेने काढलेल्या आदेशात ‘भारत प्रशासित काश्मीर’ असा धक्कादायक उल्लेख करण्यात आला होता. यानंतर काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला होता. या मुद्द्यावर पंतप्रधान मोदी आणि त्यांचे सहकारी शांत का बसलेत ? असा सवालही काँग्रसने उपस्थित केला होता.
जम्मू-काश्मीरच्या अनंतनागमध्ये अमरनाथ यात्रेकरूंच्या बसवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यावरून काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सडकून टीका केली होती. अल्पावधीसाठी राजकीय लाभ मिळवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणाने काश्मीरमध्ये दहशतवादासाठी जागा तयार केली, असे राहुल म्हणाले होते.
पीडीपीबरोबर आघाडी सरकार स्थापन करण्याच्या मोदींच्या निर्णयाची किंमत भारताला चुकवावी लागत आहे. मोदींच्या व्यक्तीगत फायद्यामुळे भारताचे रणनीतीक नुकसान होत असून निष्पापांच्या रक्ताचा सडा पडत आहे, अशा शब्दांत राहुल गांधींनी मोदींवर टीका केली होती.
सिक्कीममध्ये चीनबरोबर सुरू असलेल्या सीमा वादावरूनही राहुल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली होती. सिक्कीममध्ये चीनने केलेल्या अतिक्रमणावर मोदी गप्प का ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. दरम्यान दोन दिवसांपूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी चिनी राजदूत लुओ झुओई यांची भेट घेतल्यावरून वाद झाला होता. आधी काँग्रेसने अशी कुठली भेट झाल्याच्या वृत्ताचा इन्कार केला होता.