‘भारतमाता की जय’ची बळजबरी नको - भागवत
By admin | Published: March 29, 2016 01:56 AM2016-03-29T01:56:57+5:302016-03-29T01:56:57+5:30
‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यासाठी कुणावरही बळजबरी केली जाऊ नये. ही घोषणा कुणावरही थोपविण्याची आवश्यकता नाही. लोक स्वत:हून ‘भारतमाता की जय’चा घोष करतील,
लखनौ : ‘भारतमाता की जय’ ही घोषणा देण्यासाठी कुणावरही बळजबरी केली जाऊ नये. ही घोषणा कुणावरही थोपविण्याची आवश्यकता नाही. लोक स्वत:हून ‘भारतमाता की जय’चा घोष करतील, असा भारत आम्हाला घडवायचा आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले आहे.
लखनौ येथे भारतीय किसान संघाच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात भागवत बोलत होते. ते म्हणाले की, जेथे लोक उत्स्फूर्तपणे भारतमाता की जय म्हणतील, असा श्रेष्ठ भारत आम्हाला घडवायचा आहे. त्यामुळे कुणावर हा नारा थोपविला जाता कामा नये. ‘भारतमाता की जय’च्या घोषणेवरून निर्माण झालेला वाद निरर्थक आहे, असे भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भागवत यांनी केलेले हे विधान महत्त्वाचे ठरते. भागवत म्हणाले, ‘आम्हाला (भारत) आमचे जीवन आणि कर्मामधून जगातील लोकांना मार्ग दाखवायचा आहे.
कुणाला पराभूत करायची वा जिंकायची आमची इच्छा नाही. आम्हाला कुणावरही आमचे विचार आणि विचारसरणी थोपवायची नाही. आम्हाला केवळ त्यांना मार्ग दाखवायचा आहे. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे तत्त्वज्ञान आणि भारतीय संस्कृतीचे अंग आहे. संपूर्ण जगापुढे आम्हाला स्वत:चे आदर्श उदाहरण निर्माण करावयाचे आहे.’ (वृत्तसंस्था)