'लॉलिपॉप नका देऊ, राम मंदिर बांधा', भाजपाला घरचा अहेर
By admin | Published: October 18, 2016 04:26 PM2016-10-18T16:26:29+5:302016-10-18T16:51:24+5:30
भाजपा खासदार विनय कटियार यांनी रामायण संग्रहालय प्रस्ताव हा फक्त लॉलिपॉप असल्याची टीका करत पक्षाला घरचा अहेर दिला आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनऊ, दि. 18 - अयोध्येत रामायण संग्रहालय बांधण्यासाठी केंद्र सरकार आणि उत्तरप्रदेश सरकारने स्वतंत्र प्रस्ताव ठेवले आहेत. मात्र भाजपा खासदार विनय कटियार यांनी रामायण संग्रहालय प्रस्ताव हा फक्त लॉलिपॉप असल्याची टीका करत पक्षाला घरचा अहेर दिला आहे. 'राम मंदिर बांधण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न होण गरजेचं आहे. संग्रहालयाच्या नावाने कुणीही आमच्या हाती लॉलीपॉप देऊ नये,' असं विनय कटियार बोलले आहेत.
'आम्हाला फक्त राम मंदिर हवं आहे, दुसरं काहीही नाही' असं बोलताना उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुका जवळ आल्याने या मुद्यावर बोलत नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. निवडणुकीदरम्यान विकास आमचा मुख्य अजेंडा असणार आहे या केंद्राच्या भुमिकेवर विचारलं असता 'विकास गरजेचा आहे, पण राम मंदिर झालंच पाहिजे,' असं विनय कटियार यांनी म्हटलं आहे.
विनय कटियार यांनी समाजवादी पक्षाचे प्रमुख मुलायम सिंग यादव यांच्यावरही टीका करत 'राज्य सरकार राम मंदिरासाठी काहीच हालचाल करत नाही, हे तेच सरकार आहे ज्यांनी मंदिरासाठी आवाज उठवणा-या कारसेवकांची हत्या केली होती', असं म्हटलं आहे. मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासोबत सर्वजण राम मंदिराच्या नावे आमच्या हाती लॉलिपॉप देण्याचा प्रयत्न करत असल्याचं विनय कटियार बोलले आहेत.
विनय कटियार यांनी भाजपा नेतृत्वाला आव्हान देत 'लोकसभेत आपलं बहुमत आहे, राम मंदिर बांधण्यासाठी सरकारने कायदा आणावा,' असं म्हटलं आहे.
केंद्रीय मंत्री महेश शर्मा यांच्यासोबत अयोध्या मंदिराला भेट देण्यासाठी का गेला नाहीत ? असा प्रश्न त्यांना यावेळी विचारण्यात आला. 'अयोध्येत मी गेलो की मला नेहमी राम मंदिर कधी बांधणार असा प्रश्न तेथील लोक विचारत असतात. मी नाही गेलो ते बरे झाले,' असं उत्तर त्यांनी यावेळी दिलं.