विरोधकांच्या ड्रायव्हरकडे शिकाऊ लायसन्सही नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2018 05:54 AM2018-12-31T05:54:36+5:302018-12-31T05:54:53+5:30
या विरोधी आघाडीच्या ड्रायव्हरकडे शिकाऊ लायसन्सही नाही. त्यामुळे ते ही गाडी खड्ड्यातही घालू शकतात!
नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला तगडे आव्हान उभे करण्यासाठी विरोधी पक्षांची आघाडी बांधण्यासाठी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी करीत असलेल्या प्रयत्नांची टर उडवत केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी रविवारी म्हणाले की, या विरोधी आघाडीच्या ड्रायव्हरकडे शिकाऊ लायसन्सही नाही. त्यामुळे ते ही गाडी खड्ड्यातही घालू शकतात!
‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत नक्वी म्हणाले की, विरोधी पक्षांतील ज्येष्ठ नेतेही नाइलाज आहे म्हणून राहुल गांधींना पाठिंबा देत आहेत. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते डॉ. फारुख अब्दुल्ला यात विशेष रस घेत आहेत; पण आपण ज्यांच्या हाती गाडीचे स्टिअरिंग ड्रायव्हर म्हणून देत आहोत त्यांच्याकडे साधे शिकाऊ लायसन्सही नाही. तेव्हा ही गाडी ते खड्ड्यात तर घालणार नाहीत ना, याचा विचार या ज्येष्ठ नेत्यांनी करायला हवा. नक्वी असेही म्हणाले की, ‘इतने खिलाड़ी एक अनाड़ी के पिछे चल रहे है, तो हम क्या कर सकते है! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यात जमीन अस्मानाचे अंतर आहे व दोघांची तुलना होऊच शकत नाही, असे सांगत अल्पसंख्य व्यवहारमंत्री म्हणाले की, एकीकडे चार दिवस काम केल्यावर चार महिने सहलीला जाणारे राहुल गांधी आहेत, तर दुसरीकडे, गेल्या चार वर्षांत साडेचार तासांचीही सुटी न घेतलेले मोदी आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपा आणि ‘रालोआ’ची कामगिरी सन २०१४ च्या तोडीची असेल, असा विश्वास व्यक्त करीत नक्वी म्हणाले की, गेल्यावेळी आम्ही मोदीजींच्या ‘नावा’वर निवडणूक जिंकली होती. यावेळी आम्ही त्यांच्या ‘कामा’वर जिंकू! उन्मादी जमावांकडून होणाऱ्या हत्यांमुळे अल्पसंख्य समाजाच्या मनात असुरक्षित भावना आहे, याचाही त्यांनी इन्कार केला. ते म्हणाले की, अशा घटनांकडे सांप्रदायिक नजरेने नव्हे, तर कायदा आणि सुव्यवस्थेता प्रश्न म्हणून पाहावयास हवे. राज्यांनीही याचदृष्टीने कारवाई करायला हवी. जातीय दंगली बंद झाल्याने आणि निरपराध अल्पसंख्य व्यक्तींना खोट्यानाट्या प्रकरणात अडकविणेही थांबल्याने देशातील अल्पसंख्य समाज पूर्णपणे आश्वस्त असून, पूर्ण स्वातंत्र्य उपभोगत आहे.