कैद्यांना जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये कोंबू नका; त्यांना मुक्त करणे योग्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 11:32 PM2018-03-31T23:32:24+5:302018-03-31T23:32:24+5:30
देशातील १३०० तुरुंगांमध्ये क्षमतेच्या किती तरी पट अधिका कैदी ठेवण्यात आले असून, काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा ६०० टक्के कैदी असल्याबद्दल संताप व्यक्त करीत, ‘ कैद्यांना असे जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये डांबता येणार नाही, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे.
नवी दिल्ली : देशातील १३०० तुरुंगांमध्ये क्षमतेच्या किती तरी पट अधिका कैदी ठेवण्यात आले असून, काही तुरुंगांमध्ये तर क्षमतेपेक्षा ६०० टक्के कैदी असल्याबद्दल संताप व्यक्त करीत, ‘ कैद्यांना असे जनावरांप्रमाणे तुरुंगांमध्ये डांबता येणार नाही, असा इशारा सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना दिला आहे. तुरुंगात क्षमतेहून अधिक कैदी ठेवल्याबद्दल तीव्र नाराजीही न्यायालयाने व्यक्त केली आहे.
जिथे तुम्ही कैद्यांना योग्य पद्धतीने ठेवत नाही, तर मग तुरुंग सुधारणेची चर्चा करण्याला काय अर्थ आहे. कैद्यांना जनावरांप्रमाणे कोंबून ठेवण्यापेक्षा त्यांना मुक्त करणे अधिक योग्य ठरेल, असेही सांगत सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांच्या व केंद्रशासित प्रदेशांच्या संबंधित राज्यांचे पोलीस महासंचालक (कारागृहे) यांना न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केल्याबद्दल नोटिसा पाठवण्याचा इशारा न्या. एन. बी. लोकूर व न्या. दीपक गुप्ता यांनी दिला. राज्य व केंद्र सरकारने यांच्या निष्काळजीपणावरही त्यांनी ताशेरे ओढले.
जामीन मिळूनही आतच
देशातील अनेक कारागृहांमध्ये असे काही कैदी आहेत, की त्यांना जामीन मंजूर झाला आहे. पण त्या कैद्यांना हमी देणे शाक्य न झाल्याने त्यांची सुटका करण्यात आलेली नाही आणि किरकोळ गुन्ह्यांसाठी अटक झालेले व जामीन मिळू शकणारे कैदीही खितपत पडून आहेत, याचा उल्लेख करीत न्यायालयाने तुरुंग प्रशासनाच्या एकूणच कामकाज पद्धतीवर टीका केली.