केवळ ‘ड्रामेबाजी’ नको !
By admin | Published: June 29, 2016 05:10 AM2016-06-29T05:10:55+5:302016-06-29T05:10:55+5:30
पाकिस्तानच्या संदर्भात कोणतेही सर्वंकष धोरण नाही आणि कूटनीतीला ‘ड्रामेबाजी’ची नव्हे, तर गांभीर्याची गरज आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षांनी केली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे पाकिस्तानच्या संदर्भात कोणतेही सर्वंकष धोरण नाही आणि कूटनीतीला ‘ड्रामेबाजी’ची नव्हे, तर गांभीर्याची गरज आहे, अशी जोरदार टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
शांतता हाच पाकिस्तानसोबत चर्चा करण्याच्या भारताच्या प्रयत्नांमागचा सर्वोच्च हेतू आहे, परंतु सुरक्षा दलांना वाटेल त्या पद्धतीने प्रत्युत्तर देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे, असे वक्तव्य मोदींनी सोमवारी केले होते. त्यानंतर, दुसऱ्या दिवशी काँग्रेस व माकपाने मोदींवर तोफ डागली. काँग्रेसचे प्रवक्ते आनंद शर्मा म्हणाले, ‘पाकिस्तानसोबत चर्चा करण्याला कुणाचाही विरोध नाही, परंतु आम्ही त्यांना (मोदी) जो प्रश्न विचारला आहे, तो विरोधी पक्षांना विश्वासात न घेण्याबाबत आहे. कूटनीतीला ड्रामेबाजीची नव्हे, तर गांभीर्याची गरज आहे.’
मोदींकडे पाकिस्तानच्या संदर्भात कोणतेही सर्वंकष धोरण नाही, असे सांगून माकपा नेत्या वृंदा करात यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘दहशतवादी गटांना भारताच्या विरोधात प्रोत्साहित करणाऱ्या शेजारी देशाला हाताळण्यासाठी गंभीर कूटनैतिक पाऊल उचलण्याची नितांत आवश्यकता आहे, परंतु मोदी यांनी उचललेले पाऊल केवळ शोबाजीवर आधारित आहे. तुम्ही असे सांगता की, आम्ही पाकिस्तानला बेचिराख करू आणि लगेच दुसऱ्या दिवशी तुमचे गृहमंत्री (राजनाथसिंग) पाकिस्तानविरुद्ध वापरलेल्या गोळ्यांची मोजदाद करणार नाही, असे बोलतात, परंतु नवाज शरीफ यांना भेटण्यासाठी मात्र मोदी गेले होते,’ असेही करात पुढे म्हणाल्या. (वृत्तसंस्था)
>राजन यांच्याबाबत दुटप्पी धोरण
मोदी सरकार रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांच्याबाबतीत दुटप्पी धोरण अवलंबित असल्याचा आरोप काँग्रेस नेते पी. एल. पुनिया यांनी केला. ते म्हणाले, ‘मोदी सरकारकडून एकीकडे राजन यांच्या कामाची प्रशंसा केली जाते आणि दुसरीकडे सुब्रह्मण्यम स्वामी यांनी लावलेल्या आरोपाचे समर्थन करून राजन यांना दुसरा कार्यकाळ देण्यास नकार दिला.’ आज भारतीय अर्थव्यवस्थेला स्थैर्याची गरज आहे. अशा स्थितीत राजन हे गव्हर्नर म्हणून कायम राहणे आवश्यक आहे.
>स्वामींचाही पलटवार...पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फटकारल्यानंतरही भाजपा नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांची आक्रमकता कायम आहे. स्वामींनी आता गीतेतील एका श्लोकाच्या मदतीने पलटवार केला आहे. एका भागात झालेल्या परिवर्तनाचा प्रभाव सर्वत्र झालेला दिसतो, असे टिष्ट्वट त्यांनी केले. ‘विश्व आपल्या सामान्य संतुलनाच्या अवस्थेत राहते. कुठल्याही एका भागात केलेला बदल इतर सर्व भागांमध्ये दिसतो, असा सल्ला कृष्णाने दिला आहे. सुख दु:खे...’ असे स्वामी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे.