जमीन बळकावू देणार नाही
By admin | Published: May 12, 2015 11:29 PM2015-05-12T23:29:56+5:302015-05-12T23:29:56+5:30
संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाची नरेंद्र मोदी सरकारने ‘हत्या’ केलेली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी
नवी दिल्ली : संपुआ सरकारने आणलेल्या भूसंपादन विधेयकाची नरेंद्र मोदी सरकारने ‘हत्या’ केलेली आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी लोकसभेत केला. काँग्रेस पक्ष या ‘सुटाबुटाच्या सरकार’ला शेतकऱ्यांची जमीन बळकावू देणार नाही आणि संसदेत जर शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकले गेले नाही, तर शेतकऱ्यांची ही लढाई लढण्यासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरेल, असे राहुल गांधी यांनी जाहीर केले.
काँग्रेस या भूसंपादन विधेयकाला सर्वशक्तिनिशी विरोध करणार, असे लोकसभेत वादग्रस्त भूसंपादन विधेयकावरील चर्चेदरम्यान राहुल गांधी यांनी निक्षून सांगितले. ते म्हणाले, ‘या सरकारला भूसंपादन विधेयक पारित करण्याची घाई झालेली आहे. पण हे तेवढे सोपे नाही. आम्ही हे विधेयक संसदेत रोखू शकलो नाही, तर रस्त्यावर जाऊन रोखणार. हे भूसंपादन विधेयक आणून मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मानेवर कुऱ्हाड चालविली आहे.’
जलद विकासासाठी हे भूसंपादन विधेयक आणले असल्याच्या मोदी सरकारच्या दाव्यातील हवा काढताना राहुल गांधी पुढे म्हणाले, ‘जमिनीअभावी १०० पैकी केवळ ८ प्रकल्प अडकलेले असल्याचे वित्त मंत्रालयानेच एका आरटीआयच्या उत्तरात सांगितले आहे.
केंद्र सरकारकडे जमीन आहे, राज्यांकडे जमीन आहे आणि ‘सेझ’अंतर्गत अधिग्रहित करण्यात आलेली ४० टक्के जमीन अद्याप रिकामी पडलेली आहे. मग सरकार शेतकऱ्यांची जमीन बळकावण्यावर का अडून बसले आहे? मोदी सरकार शेतकऱ्यांची जमीन भांडवलदार आणि आपल्या औद्योगिक मित्रांना देऊ इच्छिते. कारण हे सुटाबुटातील सरकार आहे. संपुआ सरकारला भूसंपादन विधेयक आणण्यासाठी दोन वर्षे लागली होती; परंतु रालोआ सरकारने काही दिवसांतच त्या विधेयकाची हत्या केली.’ (प्रतिनिधी)