मौलानांचे ऐकू नका, स्वत: कुराण वाचा - सलमा अन्सारी
By admin | Published: April 10, 2017 03:27 AM2017-04-10T03:27:23+5:302017-04-10T03:27:23+5:30
पतीने ‘तलाक’ असे तीन वेळा म्हटल्याने पत्नीला सोडचिठ्ठी दिली जाऊ शकत नाही. अशा तलाकला
अलिगढ : पतीने ‘तलाक’ असे तीन वेळा म्हटल्याने पत्नीला सोडचिठ्ठी दिली जाऊ शकत नाही. अशा तलाकला कुराणमध्ये कुठेही आधार नाही. मुस्लिम महिलांनी मौलानांच्या सांगण्यावर विश्वास न ठेवता स्वत: कुरआन वाचून तलाकचे वास्तविक तत्व समजून घ्यावे, असे मत उपराष्ट्रपती डॉ. हामिद अन्सारी यांच्या पत्नी सलमा अन्सारी यांनी व्यक्त केले.
मौखिक तलाक, ‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्व या मुस्लिमांमध्ये रुढ असलेल्या प्रथांची घटनात्मक वैधता सर्वोच्च न्यायालय तपासण्याच्या बेतात असताना आणि यावरून देशभर चर्चा सुरु असताना सलमा अन्सारी यांनी येथे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने पत्रकारांशी बोलताना हे रोखठोक विधान केले.
मुस्लिम महिलांना सल्ला देताना सलमा अन्सारी म्हणाल्या, तलाकच्या संदर्भात संभ्रम होण्याचे कारणच नाही. तुम्ही कुराण वाचलेत तर तुमचे तुम्हालाच उत्तर मिळेल. कुराणमध्ये असा (त्रिवार मौखिक तलाकचा) कोणताही नियम नाही. त्यांनी असा समज पसरविला आहे. मौलाना काय सांगतात त्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नका. भाषांतरित नव्हे तर मुळातून अरबी भाषेतील कुराण वाचा. रसूलने काय सांगितले आहे ते पाहा.
महिलांनी स्वत: कुराण वाचले नाही तर त्यांची कोणीही सहज दिशाभूल करू शकते. त्यामुळे महिलांनी धाडस करून स्वत: कुराण वाचावे आणि त्यात काय म्हटले आहे यावर अत्मचिंतन करावे, असे प्रतिपादनही त्यांनी केले. (वृत्तसंस्था)
परस्पर विरोधी भूमिका
मौखिक तलाक, ‘निकाह हलाला’ आणि बहुपत्नीत्व या प्रथा राज्यघटनेतील समानतेचे तत्व आणि लैंगिक समानता यांच्या विपरित असल्याची भूमिका केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात घेतली आहे.
याउलट अ.भा. मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने या प्रथा कुराण आणि इस्लामी धर्मशास्त्रावर आधारित असल्याने त्या राज्यघटनेच्या निकषावर तपासल्या जाऊ शकत नाहीत व यात न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही, असे प्रतिपादन केले आहे.