धर्म आणि राजकारण यांची गल्लत नको - व्यंकय्या नायडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2018 11:58 PM2018-02-17T23:58:12+5:302018-02-17T23:58:21+5:30
राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले.
तिरुअनंतपूरम : राजकारण व धर्म यांची कधीही गल्लत करता कामा नये. राजकारणाचा शिरकाव धर्मात होऊ नये आणि धर्माचा प्रभाव राजकारणावर असू नये. धर्म ही व्यक्तीची खासगी बाब आहे. ईश्वर, अल्ला, येशू ख्रिस्त, श्रीकृष्ण किंवा अयप्पा यापैकी कुणाची पूजा करायची, ही प्रत्येकाची व्यक्तिगत बाब आहे, असे प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केले. ते श्री चितिरा तिरुनल मेमोरिअल लेक्चरमध्ये बोलत होते.
भारतातील सामाजिक एकतेचा प्रवास मांडताना नायडू म्हणाले की, देशात काही लोकांना जातीच्या नावाखाली मंदिरात प्रवेश नाकारणे ही बाब धर्म तसेच संस्कृतीविरोधी आहे. स्वातंत्र्यापूर्वी देशातील दलितांचे सामाजिक एकीकरण साधणे जिकीरीचे होते. त्यामुळे दलितांना ओडिशातील जगन्नाथ मंदिर व राजस्थानच्या चामुण्डी मंदिरात प्रवेशासाठी संघर्ष करावा लागला. परंतु आजही लोक दुभंगलेले असतील तर भारत स्वत:ला एक राष्ट्र तसेच एक समतावादी सभ्य समाज म्हणवू शकणार नाही. भारतीय संस्कृती टिकण्याचे कारण आपण सर्वेजन सुखिनो भवन्तु, वसुधैव कुटुंबकम यावर विश्वास ठेवतो. संपूर्ण ब्रह्मांड हे एक कुटुंब आहे असे मानून प्रत्येकाच्या कल्याणाचा विचार करतो. भारताने आजवर कधीही कोणत्या देशावर आक्रमण केलेले नाही. कार्यक्रमास राज्यपाल न्या. पी. सदासिवम, सांस्कृतिक कार्यमंत्री ए. के. बालन हेही उपस्थित होते. (वृत्तसंस्था)
स्वत:मध्ये बदल हवेत
आजच्या लोकप्रनिधींबाबत भाष्य करताना नायडू म्हणाले की, नेत्यांची निवड लोकांनी कॅरेक्टर, कॅलिबर, कॅपॅसिटी आणि कन्डक्ट या चार ‘सी’च्या आधारे केली पाहिजे. राजा असो वा लोकशाही शासन, परंतु ती यंत्रणा सदैव सावध, जागरुक व नव्या विचारांच्या स्वीकारण्यासाठी सज्ज असली पाहिजे. यंत्रणेने वेळोवेळी गरजांनुसार स्वत:मध्ये आवश्यक बदल केले पाहिजेत.