विमानांवरून का हटत नाही गुलामगिरीचे प्रतीक VT

By Admin | Published: June 2, 2017 03:45 AM2017-06-02T03:45:41+5:302017-06-02T03:45:41+5:30

तुम्ही कोणत्याही भारतीय विमानात चढता तेव्हा त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरवर नजर अवश्य जाते. हा नंबर VTने सुरू

Do not move from plane to slavery VT | विमानांवरून का हटत नाही गुलामगिरीचे प्रतीक VT

विमानांवरून का हटत नाही गुलामगिरीचे प्रतीक VT

googlenewsNext

विकास मिश्र/लोकमत न्यूज नेटवर्क
तुम्ही कोणत्याही भारतीय विमानात चढता तेव्हा त्याच्या रजिस्ट्रेशन नंबरवर नजर अवश्य जाते. हा नंबर VTने सुरू होतो. ज्यांना व्हीटीचा अर्थ माहीत नसतो, ते सर्वसाधारणपणे त्याकडे फारसे लक्ष देत नाहीत, मात्र ज्यांना त्याचा अर्थ माहीत असतो त्यांच्या मनात प्रत्येक वेळी प्रश्न उपस्थित होतो की गुलामीचे हे प्रतीक आम्ही कुठवर वाहून नेत राहणार? या VT चा अर्थ होतो ‘व्हाईसराय टेरिटरी’ म्हणजे व्हाईसरायचा भूभाग. भारतीय विमानांच्या नोंदणीक्रमांकात VT नंतर डॅश आणि नंतर नागरी विमान वाहतूक प्राधिकरण आपल्या मापदंडानुसार तीन अक्षर जोडत असते. चित्र बघा. त्यात एअर इंडियाच्या विमानाला VT-ALA हा नोंदणी क्रमांक दिला आहे. भारत पारतंत्र्यात असताना ब्रिटिश शासकाला व्हाईसराय संबोधले जात होते. त्यांच्या अधिपत्याखालील भूभागात विमानांना त्यावेळी हा रजिस्ट्रेशन कोड दिला जायचा. त्यावेळी भारताकडे नोंदणीसाठी नवा कोड मिळविण्याचा पर्याय होता, मात्र भारताने असे केले नाही. पाकिस्तानने मात्र AP हा नवा कोड मिळविला. गुलामगिरीतून मुक्त झालेल्या सर्वच देशांनी नवा कोड मिळविला, हे उल्लेखनीय.
भारताने एक दशकापूर्वी प्रयत्न आरंभिले होते, मात्र तोपर्यंत वेळ होऊन गेली होती. भारताला मनाप्रमाणे कोड मिळाला नाही, ही चर्चा करण्यापूर्वी विमानांच्या नोंदणीची प्रक्रिया काय आहे, हे जाणून घेण्यासह त्याचा इतिहास काय आहे, हेही जाणून घ्यायला हवे. विमान हवेत उडत असते त्यावेळी प्रत्येक विमानाला आपला रजिस्ट्रेशन क्रमांक असावा, जो जगातील कोणत्याही विमानाच्या क्रमांकाशी मिळताजुळता नसावा, या उद्देशाने प्रत्येक देशाने वेगळा कोड निश्चित केला होता. इतिहास चाळून पाहिला असता विमानाच्या नोंदणीच्या प्रारंभीचा क्रमांक १९१३ मध्ये लंडनमध्ये आयोजित रेडिओ टेलिग्राफिक कॉन्फरन्सच्या आधारावर निश्चित करण्यात आला होता. त्यावेळी एका अक्षरानंतर डॅश देऊन चार आणखी अक्षर लिहिले जात होते. प्रत्येक मोठ्या देशाला एक अक्षर दिले जात होते. छोट्या देशांना अनेक वेळा दुसऱ्या देशांचा क्रमांक माहीत करावा लागायचा. पहिल्या अक्षरानंतर ते आपापले दुसरे अक्षर वापरत असत. हा नोंदणीक्रमांक केवळ विमानांसाठी नव्हे तर प्रत्येक रेडिओ सिग्नलसाठी वापरला जात होता. १९१९ मध्ये पॅरिसमध्ये एअर नेव्हिगेशन कन्व्हेंशन पार पडल्यानंतर विमानांना खास नोंदणी क्रमांक जारी करण्यात येऊ लागले. पहिल्या अक्षरानंतर डॅश लावून चार अक्षर लिहिले जात होते. त्यात इंग्रजीतील स्वर हा शब्द लिहिणे अनिवार्य असायचे.
A, E, I, O, U ला स्वर संबोधले जाते. नोंदणीची ही पद्धत १९१८ पर्यंत चालू होती. तत्पूर्वी १९२७ मध्ये वॉशिंग्टनमध्ये रेडिओ टेलिग्राफ कन्व्हेंशन पार पडले त्यावेळी मार्किंग लिस्टचा आढावा घेण्यात आला. १९४४ मध्ये शिकागोतील आंतरराष्ट्रीय नागरी उड्डयणाबाबत पुन्हा चर्चा झाली तेव्हा प्रत्येक देशाला त्या त्या देशाच्या राष्ट्रीय विमान वाहतूक प्राधिकरणाकडून क्रमांक देणे अनिवार्य ठरविण्यात आले.
एका विमानाची नोंदणी केवळ एकदाच करता येईल, असा निर्णयही यावेळी घेण्यात आला. तथापि विमानाच्या मालकाचा देश बदलला तर विमानाचा नोंदणी क्रमांक देखील बदलेल. सध्याच्या नियमानुसार, प्रत्येक विमानासाठी नॅशनल एव्हिएशन अ‍ॅथॉरिटीकडून एक नोंदणी क्रमांक दिला जातो. हा क्रमांक (राष्ट्रीयत्व कोडसह) एखाद्या दुचाकी अथवा चारचाकी वाहनावर लिहिलेला असतो त्याप्रमाणे विमानावर ठळकपणे लिहिण्यात आला पाहिजे. नोंदणी क्रमांक लिहिलेली प्लेट फायरप्रूफ असणे आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही अपघाताच्या स्थितीत हा क्रमांक मिटणार नाही.
शिकागो कन्व्हेंशननुसार, राष्ट्रीयत्वासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक देशाचा एक कोड निश्चित केलेला आहे. उदाहरणादाखल, कॅनडाला C, ग्रेट ब्रिटनला N, जर्मनीला D. भारताने ब्रिटिश राजवटीतील VT हा कोड आजही कायम ठेवलेला आहे.
गेल्या वर्षी राज्यसभेत खासदार तरुण विजय यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. आम्ही गुलामीचे प्रतीक का हटवित नाही, असा सवाल त्यांनी केला होता. त्यामुळे भारताने २००६ च्या पूर्वीच नव्या कोडसाठी इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन आॅर्गनायझेशनकडे (आयसीएओ) अर्ज दाखल केला होता हे समजले.
भारताला IN (इंडिया), BH (भारत) किंवा HI (हिंदुस्तान) असा कोड हवा होता. परंतु असा कोणताही कोड उपलब्ध नाही, असे सांगून आयसीएओने भारताचा हा अर्ज फेटाळून लवाला होता. B चीनकडे आहे. BH हाँगकाँगकडे आहे. HI डॉमिनिकल रिपब्लिककडे आणि I इटलीकडे आहे. आता केवळ X  आणि V ही दोनच अक्षरे शिल्लक आहेत, जी भारताला मिळू शकतात. परंतु त्यातून भारत, इंडिया वा हिंदुस्तानचा बोध होत नाही. त्यामुळे भारताने त्यातून माघार घेतली आहे.
भारताला केवळ एकदाच आपला नवा कोड घेता घेता येऊ शकतो. त्यामुळे X  अथवा V यापैकी कोणतेही एक अक्षर घेणे किंवा मनासारखा कोड मिळविण्यासाठी प्रतीक्षा करणे यापैकी कोणताही एक पर्याय भारताला निवडावा लागणार आहे. तथापि प्रतीक्षा करण्यात काही अर्थ नाही. गुलामीचे प्रतीक असलेला VT हा कोड शक्य
तितक्या लवकर हटविण्यात आला पाहिजे.

आयसीएओमध्ये आहेत १९१ सदस्य

सपूर्ण जगभरात सिव्हिल एव्हिएशनचे व्यवस्थापन सांभाळणारी इंटरनॅशनल सिव्हिल एव्हिएशन आॅर्गनायझेशन (आयसीएओ) ही संस्था खरे तर संयुक्त राष्ट्राची स्पेशलाईज्ड एजन्सी आहे. या संस्थेचे एकूण १९१ सदस्य आहेत. बहुतांश सदस्य हे राष्ट्रच असले तरी काही कंपन्याही त्यात सामील आहेत. शिकागो कन्व्हेंशनच्या वेळी १९४४ मध्ये या संस्थेची स्थापना करण्यात आली होती. केवळ कोड प्रदान करणे हाच या संस्थेचा उद्देश नाही तर संपूर्ण जगात विमानांचे उड्डाण सुरक्षित आणि पर्यावरणपूरक बनविणे हाही आहे. या संस्थेचे धोरण लागू करणे सर्व सदस्यांना बंधनकारक आहे.

 

Web Title: Do not move from plane to slavery VT

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.