रस्त्यांना बाबर नको नथुराम गोडसेंचे नाव द्या - हिंदू महासभा
By Admin | Published: September 2, 2015 09:42 AM2015-09-02T09:42:40+5:302015-09-02T09:46:23+5:30
रस्त्यांना भारतीय संस्कृती व मंदिरांचे नुकसान करणा-या मुस्लिम राजांचे नाव देण्याऐवजी नथुराम गोडसेंचे नाव द्यावे अशी हिंदू महासभेने केली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - दिल्लीतील रस्त्यांना भारतीय संस्कृती व मंदिरांचे नुकसान करणा-या मुस्लिम राजांचे नाव देण्याऐवजी स्वातंत्र्यवीर सावरकर, मदन मोहन मालवीय, छत्रपती शिवाजी महाराज यासारख्या महान पुरुषांची नाव द्यावीत अशी मागणी हिंदू महासभेने केंद्रीय गृहमंत्र्यांकडे केली आहे. मात्र हिंदू महासभेने या महापुरुषांच्या यादीत नथुराम गोडसेंच्या नावाचा समावेश केल्याने वाद निर्माण झाला आहे.
दिल्लीतील औरंगजेब रोडचे नाव बदलून या रस्त्याला माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव देण्यात आले आहे. यानंतर दिल्लीत मुस्लिम राजांचे नाव असलेल्या सर्वच रस्त्यांचे नामकरण करण्याची मागणी जोर धरत आहे. हिंदू महासभेने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र पाठवून बाबर, हुमायू, शाहजहाँ, तुघलक यासारख्या मुस्लिम राजांचे नाव असलेल्या रस्त्यांचे नाव बदलावे अशी मागणी केली आहे. मात्र हिंदू महासभेने पत्रात रस्त्याला नथुराम गोडसेंचे नाव देण्याची मागणी करण्यात आल्याने नवीनच वाद निर्माण झाला.