मोठ्या राजकीय देणग्या रोखीने देऊ नका! प्राप्तिकर विभागाचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 01:21 AM2018-01-24T01:21:14+5:302018-01-24T01:21:27+5:30
राजकीय पक्षांना २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीने देऊ नका, असा इशारा प्राप्तिकर विभागाने नागरिकांना दिला आहे. राजकीय पक्षांना मिळणा-या देणग्यांत अधिक पारदर्शकता यावी, यासाठी हा इशारा जारी देण्यात आला आहे.
नवी दिल्ली : राजकीय पक्षांना २ हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेची देणगी रोखीने देऊ नका, असा इशारा प्राप्तिकर विभागाने नागरिकांना दिला आहे. राजकीय पक्षांना मिळणा-या देणग्यांत अधिक पारदर्शकता यावी, यासाठी हा इशारा जारी देण्यात आला आहे.
राजकीय पक्षांना देणग्या देण्यासाठी ‘इलेक्टोरल बाँड’ अर्थात निवडणूक रोख्यांची योजना सरकारने नुकतीच घोषित केली आहे. स्टेट बँकेच्या विशिष्ट शाखांमधून हे रोखे खरेदी करून नागरिकांना ते राजकीय पक्षांना देता येईल. या योजनेनुसारच २ हजारांपेक्षा जास्तीची रक्कम राजकीय पक्षांना रोखीच्या स्वरूपात देणगीदाखल देता येत नाही.
प्राप्तिकर विभागाने म्हटले आहे की, नोंदणीकृत ट्रस्ट व राजकीय पक्ष यांना २ हजारांपेक्षा जास्तीची रक्कम रोख स्वरूपात देणगीदाखल कोणीही देऊ नये. केंद्रीय थेट कर बोर्डाच्या वतीने त्याची जाहिरात जारी दिली. विशेष म्हणजे, विभागाने पहिल्यांदाच राजकीय देणग्यांबाबत जाहीरपणे सूचना केली आहे.
सरकारने जारी केलेल्या इलेक्टोरल बाँडस् योजनेच्या पार्श्वभूमीवर प्राप्तिकर विभागाने नवे नियम जारी केले आहेत. काय करू नये, यासंबंधीच्या आणखी काही सूचना या संदर्भात विभागाने जारी केल्या आहेत. त्यात म्हटले आहे की, एकाच व्यक्तीकडून एकाच दिवसात २ लाखांपेक्षा जास्त रोख रक्कम स्वीकारू नका. एकाच कारणासाठी वेगवेगळे व्यवहार दाखवूनही अशी रक्कम कोणाला स्वीकारता येणार नाही. अचल संपत्तीच्या व्यवहारात २0 हजारांपेक्षा जास्तीची रक्कम रोखीने देता अथवा स्वीकारता येणार नाही. व्यवसायाशी संबंधित व्यवहारात १0 हजारांपेक्षा जास्तीची रक्कम रोखीने देता येणार नाही.
...तर दंड भरावा लागेल
अशा प्रकारच्या रोखीच्या व्यवहारांना आता लोकांनी स्वत:हूनच ‘नाही’ म्हटले पाहिजे. प्राप्तिकर विभागाने ठरवून दिलेल्या या मर्यादांचा भंग केल्यास कर अथवा दंड लागू शकतो. ‘विना रोखीचे व्यवहार करा, स्वच्छ राहा’ असा संदेश या जाहिरातीत देण्यात आला आहे.