शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याची योजना नाही! सरकारचे धक्कादायक उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2018 05:50 AM2018-12-20T05:50:36+5:302018-12-20T05:52:06+5:30
केंद्र सरकारचे लोकसभेत धक्कादायक उत्तर
नवी दिल्ली : देशातील शेतकºयांचे उत्पन्न २0२२ पर्यंत दुप्पट करू, असे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपा नेते वारंवार देत असले तरी अशी कोणतीही योजना आखण्यात आलेली नाही, अशी माहितीच केंद्र सरकारने लोकसभेत मंगळवारी दिली.
अण्णा द्रमुकचे सदस्य आर. पार्थिपन यांच्या अतारांकित प्रश्नाच्या उत्तरात शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची कोणतीही योजना नसल्याचे लेखी उत्तर अन्नप्रक्रिया उद्योग राज्यमंत्री साध्वी निरंजन यांनी दिले आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाच्या माध्यमातून शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट करण्याची सरकार योजना तयार करीत आहे का आणि असल्यास त्याचे स्वरूप काय आहे, असा पार्थिपन यांचा प्रश्न होता. त्याच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरात साध्वी निरंजन यांनी ‘नाही’ असे उत्तर दिले. मात्र, प्रधानमंत्री किसान संपदा योजनेद्वारे शेती उत्पादन खराब होण्यापासून वाचवणे, त्यावर अन्नप्रक्रिया करणे आणि त्या उत्पादनांची मागणी वाढवून त्यामार्फत शेतकºयांचे उत्पन्न वाढण्यास मदत करणे, अशी योजना असल्याचे उत्तर त्यांनी पुढील प्रश्नाच्या उत्तरात नमूद केले.